Global Economic Crisis | जागतिक आर्थिक घडामोडींमध्ये अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे सध्या चिंतेची लाट उसळली आहे. विशेषतः 2025 मध्ये जागतिक मंदी येण्याची शक्यता आता अधिक ठोसपणे व्यक्त केली जात आहे. JP Morgan चे मुख्य अर्थतज्ज्ञ Bruce Kasman यांनी या संदर्भात मोठा इशारा दिला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, 2025 पर्यंत जागतिक मंदी येण्याची शक्यता आता 60% वर पोहोचली आहे, जी याआधी केवळ 40% होती. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकन कंपन्यांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण तयार झालं असून पुरवठा साखळीतही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील व्हाइट हाऊसने याआधी दावा केला होता की, या टॅरिफ धोरणामुळे सरकारला दरवर्षी सुमारे 600 अब्ज डॉलर्सचा महसूल मिळेल. मात्र, अनेक जागतिक अर्थतज्ज्ञांनी या दाव्यावर शंका उपस्थित केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, टॅरिफमुळे उद्योगांमध्ये निराशा वाढेल, बाजारात अस्थिरता निर्माण होईल आणि बेरोजगारी दरात वाढ होऊ शकते.
मंदीची शक्यता वाढली-
Goldman Sachs या आघाडीच्या बँकेनेही मंदीची शक्यता 20% वरून थेट 35% पर्यंत वाढवली आहे. कंपनीने 2025 मध्ये GDP वाढीचा दर फक्त 1% राहील असा अंदाज वर्तवला आहे. तसेच, बेरोजगारी दरही 4.5% पर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर, अमेरिकेचे व्यापार भागीदार प्रत्युत्तरात टॅरिफ सरासरी 15% पर्यंत वाढवू शकतात, असा इशारा दिला आहे.
जागतिक महागाई वाढल्याच्या पार्श्वभूमीवर Federal Reserve वरही आर्थिक दबाव वाढला आहे. परिस्थितीचा अंदाज घेता, 2025 मध्ये Fed तीन वेळा व्याजदर कपात करू शकते. यामुळे नागरिकांत आणि गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
Mark Zandi यांचा गंभीर इशारा-
मूडीज अॅनालिटिक्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ Mark Zandi यांनीही मंदीबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये सांगितलं की, व्यापार युद्धाच्या तीव्रतेमुळे आणि सरकारी खर्चात कपात झाल्यामुळे 2025 मध्ये मंदी येण्याची शक्यता आता 40% पर्यंत वाढली आहे.
सध्या संपूर्ण जगाचं लक्ष व्हाइट हाऊस आणि Federal Reserve बँकेकडे लागलेलं आहे. हे धोरण कितपत योग्य ठरेल आणि बाजाराला सावरता येईल की नाही, हे येणारा काळच ठरवेल.