Upcoming IPO 2025:- गेल्या काही आठवड्यांपासून आयपीओ बाजारात शुकशुकाट होता. पण आता पुन्हा एकदा हालचाल सुरू झाली आहे. शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार होतंय, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास परततोय, आणि त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या शेअर्सची पहिली विक्री म्हणजेच IPO आणण्याच्या तयारीत आहेत. ज्यांना नवीन कंपन्यांमध्ये सुरुवातीला गुंतवणूक करायची आहे, त्यांच्या साठी हा काळ खऱ्या अर्थानं संधीचा आहे.
सेबीने दिला 15 कंपन्यांना आयपीओ वाढण्यासाठी ग्रीन सिग्नल
सेबीने अलीकडेच १५ नव्या कंपन्यांना आपला IPO आणण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. या सगळ्या आयपीओंची एकूण रक्कम सुमारे ३७,००० कोटी रुपये इतकी आहे. म्हणजेच एवढा पैसा बाजारातून उभारण्याची योजना आहे. या यादीत काही मोठी नावं आहेत जसं की हिरो फिनकॉर्प, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेस. या कंपन्या आपल्या उद्योगविश्वात आधीपासूनच नावाजलेल्या आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांची नजर त्यांच्यावर खिळून आहे.

एचडीएफसी बँकेची सहायक कंपनी असलेल्या एचडीबी फायनान्शियलचा IPO हा सर्वात मोठा मानला जातोय. सुमारे १२,५०० कोटी रुपयांचा हा इश्यू आहे. त्यात २,५०० कोटींची नव्याने समभाग विक्री होईल आणि उरलेले १०,००० कोटी रुपये एचडीएफसी बँक आपले हिस्से विकून उभारणार आहे. विशेष म्हणजे, सध्या एचडीएफसी बँकेकडे या कंपनीतील ९४.३ टक्के भागभांडवल आहे.
दुसरीकडे, हिरो फिनकॉर्पनेही जोरदार तयारी केली आहे. ३,६६८ कोटी रुपयांचा IPO आणण्यास त्यांना सेबीकडून परवानगी मिळाली आहे. यात २,१०० कोटी रुपयांचे नव्याने शेअर्स जारी होतील, तर उर्वरित शेअर्स विद्यमान गुंतवणूकदारांकडून विकले जातील. यामुळे कंपनीला नव्या भांडवलाची मदत तर होईलच, पण गुंतवणूकदारांनाही एक मजबूत संधी मिळेल.
सौरऊर्जेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विक्रम सोलर या कंपनीनेही आपली तयारी पूर्ण केली आहे. १,५०० कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि १.७ कोटी शेअर्सची विक्री अशा स्वरूपात त्यांचा IPO येणार आहे. हे क्षेत्र सध्या मोठ्या बदलांमधून जात असल्यामुळे गुंतवणूकदारांची त्यावर विशेष नजर राहणार आहे.
प्राइम डेटाबेसच्या माहितीनुसार, सध्या ७२ कंपन्यांना सेबीकडून आयपीओसाठी परवानगी मिळालेली आहे आणि या सगळ्यांमधून एकूण १.४ लाख कोटी रुपये उभारले जाऊ शकतात. इतकंच नाही, तर आणखी ६८ कंपन्यांनी मंजुरीसाठी अर्ज केले आहेत आणि त्यांचं लक्ष्य आहे जवळपास ९४,००० कोटी रुपये. एकूण मिळून, १४० कंपन्या IPO च्या माध्यमातून सुमारे २.३५ लाख कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत.