UPI Payment Application : अलीकडे भारतात पैशांच्या व्यवहारासाठी कॅश ऐवजी डिजिटल पेमेंट एप्लीकेशनचा उपयोग केला जात आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम यांसारख्या एप्लीकेशनचा उपयोग करून आता पेमेंट केले जाऊ लागले आहे. सरकारने देखील कॅशलेस इकॉनोमीला चालना दिली असल्याने आणि ऑनलाइन पेमेंट सर्वसामान्यांसाठी सुविधायुक्त असल्याने ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
दरम्यान जर तुम्ही ही फोन पे, गुगल पे, पेटीएम यांसारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशनचा उपयोग करून ऑनलाईन पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतातील काही फोन पे, गुगल पे, पेटीएम यांसारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन वापरकर्त्यांचे यूपीआय आयडी बंद केले जाणार आहेत.

यूपीआय आयडी बंद झाल्यानंतर अशा लोकांना ऑनलाइन पेमेंट करता येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार एनपीसीआय 31 डिसेंबर नंतर अशा यूपीआय आयडी बंद करणार आहेत ज्या युपीआय आयडीचा गेल्या एका वर्षात वापर झालेला नाही, म्हणजेच गेल्या एका वर्षात ज्या युपीआय आयडीचा वापर करून कोणतेच ट्रांजेक्शन म्हणजेच व्यवहार झालेले नाहीत अशा आयडी बंद करणार आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. Google Pay, Paytm, PhonePe सारख्या सर्व बँका आणि थर्ड पार्टी अॅप्स अशा UPI आयडी ब्लॉक करणार आहेत ज्यात एका वर्षापेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार झालेला नाही.
कोणते अकाउंट होणार बंद
तुमच्या UPI आयडीवरून जर गेल्या एका वर्षात पैसे क्रेडिट किंवा डेबिट झालेले नसतील तर ही खाती बंद केली जातील. ही आयडी 31 डिसेंबर 2023 पासून बंद होणार आहेत. नवीन वर्षापासून ग्राहकांना या आयडीवरून व्यवहार करता येणार नाहीत. NPCI ने हे UPI आयडी ओळखण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना ३१ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. तुमचा UPI आयडी निष्क्रिय करण्यापूर्वी तुमची संबंधित बँक तुम्हाला ईमेल किंवा SMS द्वारे संदेश पाठवणार आहे.