गुंतवणूकदारांना केवळ एका दिवसात श्रीमंत केलं ‘या’ IPO ने…102 रुपयांना खरेदी आणि लिस्टिंगला थेट 153 रुपयांवर

Published on -

Sachiram IPO:- आजच्या शेअर बाजारात एक लहान पण लक्षवेधी घडामोड घडली. सचिरोम लिमिटेड या नवख्या कंपनीने पहिल्याच दिवशी जोरदार एन्ट्री घेत बाजारात खळबळ उडवून दिली. सुगंध आणि फ्लेवर्स तयार करणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सनी लिस्टिंगच्या दिवशीच तब्बल ५० टक्क्यांहून अधिक नफा कमावून गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले.

सचिरोम लिमिटेडने आपल्या शेअर्सची सुरुवात १५३ रुपयांवर केली, जे मूळ आयपीओ किंमतीपेक्षा (१०२ रुपये) तब्बल ५१ रुपयांनी अधिक होते. इतकंच नव्हे, तर लिस्टिंगनंतर काही वेळातच या शेअरने आणखी उंच भरारी घेत १५९.९० रुपयांवर पोहोचत ४ टक्क्यांहून अधिक वाढ दाखवली. विशेष म्हणजे, बाजारात या शेअरची लिस्टिंग ग्रे मार्केटमधल्या अपेक्षेपेक्षा जास्त दराने झाली. लिस्टिंगपूर्वी हे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये १२६ रुपयांपर्यंत पोहोचले होते, पण प्रत्यक्षात त्यापेक्षा बऱ्याच वरच्या दराने लिस्ट झाले.

सचिरोमचा आयपीओने कशी केली कामगिरी?

सचिरोमचा आयपीओही चांगलाच गाजला. ९ जून ते ११ जून २०२५ या कालावधीत खुला असलेला हा सार्वजनिक समभागविक्री कार्यक्रम ६१.६२ कोटी रुपये एवढ्या आकाराचा होता. पण गुंतवणूकदारांनी यावर इतकी गर्दी केली की संपूर्ण आयपीओ तब्बल ३१३ पटांनी सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांची श्रेणी १८० पटांनी भरली, तर संस्थागत गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. एनआयआय कोट्यांमध्ये ८०८ पटांहून अधिक मागणी होती, तर क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) श्रेणीमध्येही १७३ पटांनी ओव्हरसबस्क्रिप्शन झालं.

सामान्य गुंतवणूकदारांसाठी मात्र हा आयपीओ काहीसा महागडा ठरला. कारण एका लॉटमध्ये तब्बल १२०० शेअर्स होते आणि एका लॉटसाठी जवळपास १.२२ लाख रुपये गुंतवावे लागले. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी थोडं मोठं भांडवल आवश्यक होतं.

सचिरोम लिमिटेडच्या प्रवर्तकांमध्ये मनोज अरोरा, अलका अरोरा आणि ध्रुव अरोरा यांचा समावेश आहे. आयपीओपूर्वी या तिघांचाच कंपनीवर पूर्ण मालकी हक्क होता. आता बाजारात यशस्वी पाऊल टाकल्यानंतर, कंपनीच्या पुढील वाटचालीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहील हे नक्की. छोट्या शेअरने दिलेली ही मोठी कामगिरी अनेकांना उत्साहित करणारी ठरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!