Low Price Stock India:- आज शेअर बाजारात एका खास बातमीने लक्ष वेधून घेतलं व ती बातमी म्हणजे सात वर्षांच्या खडतर प्रवासानंतर एअरलाइन क्षेत्रातील स्पाइसजेट या कंपनीने अखेर वार्षिक नफ्यात कमबॅक केलं आहे. कोरोना, इंधन दरवाढ आणि कर्जाच्या ओझ्याने गेल्या काही वर्षांत ही कंपनी सतत तोट्यात होती. पण आता काहीसं चित्र बदलताना दिसतंय.
स्पाइसजेटला ३२४.८७ कोटीचा नफा
मार्च २०२५ संपलेल्या तिमाहीत स्पाइसजेटने तब्बल ३२४.८७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा ११८.९० कोटी रुपये होता. म्हणजेच एका वर्षात कंपनीच्या नफ्यात १७४ टक्क्यांची झपाट्याने वाढ झाली आहे. ही गोष्ट नक्कीच महत्त्वाची आहे, कारण केवळ एका तिमाहीची नव्हे, तर पूर्ण आर्थिक वर्षाची कामगिरीही कंपनीच्या बाजूने गेली आहे.

२०२४-२५ या आर्थिक वर्षात स्पाइसजेटचा निव्वळ नफा ५८ कोटी रुपये झाला आहे. ही कामगिरी विशेष आहे.कारण २०२३-२४ मध्ये कंपनीला ४०९ कोटींचा तोटा झाला होता. सात वर्षांनंतर कंपनीने संपूर्ण आर्थिक वर्ष नफ्यात बंद केलं, हे खुद्द व्यवस्थापनासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारं आहे.
तरीसुद्धा, काही आकडे अजूनही चिंता वाढवणारे आहेत. मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल १४४६.३७ कोटी रुपये होता, जो एक वर्षापूर्वीच्या १७१९.३७ कोटी रुपयांपेक्षा सुमारे १६ टक्क्यांनी कमी आहे. म्हणजेच खर्च नियंत्रण आणि इतर मार्गांनी नफा झाला असला, तरी उत्पन्नात घट झालेलीच आहे. हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण दीर्घकालीन स्थैर्यासाठी केवळ नफा नाही, तर मजबूत महसूलही आवश्यक असतो.
स्पाइसजेटच्या शेअर्सची सध्याची स्थिती काय?
शेअरच्या किंमतीच्या बाबतीत पाहिलं, तर शुक्रवारी स्पाइसजेटचा शेअर १.८५ टक्क्यांनी घसरून ४३.८१ रुपयांवर बंद झाला. गेल्या आठवड्यात शेअरमध्ये ५.७७ टक्क्यांची घसरण झाली असली तरी, एका वर्षाच्या तुलनेत पाहिलं, तर त्याच्या किंमतीत सुमारे ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७९.९० रुपये आहे आणि नीचांक ३९.९१ रुपये. सध्या कंपनीचं मार्केट कॅप ५,६१६ कोटी रुपयांवर आहे.