Money Saving Tips:- प्रत्येक व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करतात व या माध्यमातून चांगल्या प्रकारे पैसा देखील कमवतात. परंतु कितीही काही केले तरी पैशांची बचत होतच नाही किंवा पैसा शिल्लक राहतच नाही अशी तक्रार बऱ्याच जणांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला येते.
पगारदार व्यक्तींचे तर पगार झाल्यानंतरचे पहिले दहा-पंधरा दिवस व्यवस्थित राहतात परंतु त्यानंतर मात्र पगाराची पुढच्या महिन्याची तारीख येईपर्यंत एक रुपया देखील शिल्लक राहत नाही. बरेचजण पैशांची बचत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसतात परंतु तरीदेखील पैसा शिल्लक राहत नाही किंवा पैसा टिकत नाही.
यावेळी जर काही आर्थिक संकट आले तर मात्र खूप मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडतो. तसेच जे तरुण-तरुणी नवीन लग्न करतात व त्यांच्यावर नवीन संसाराची जबाबदारी आलेले असते. यावेळी ही परिस्थिती बऱ्याचदा उद्भवताना आपल्याला दिसून येते. याकरिता आधीच तयारी करून ठेवणे खूप गरजेचे असते व काही महत्त्वाच्या गोष्टी पाळणे देखील तितकेच गरजेचे असते.
या पद्धतीने तयारी करा व आर्थिक संकटापासून मुक्त व्हा
1- जिथे नोकरी करत आहात तिथे आनंदी रहा– यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात त्या ठिकाणी तुम्ही आनंदी आहात का याची खात्री करणे गरजेचे आहे. परंतु लगेच नोकरी लागल्यानंतर एखाद्या वर्षांनी अशा प्रकारचा प्रश्न स्वतःला विचारणे जरा चुकीचे ठरू शकते.
परंतु नोकरीला लागल्यानंतर पाच ते सात वर्षांनी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारू शकतात की तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात तिथे आनंदी आहात का? परंतु पाच ते सहा वर्षे एखाद्या ठिकाणी नोकरी करून देखील तुम्ही समाधानी नसाल तर विचार न करता तुम्ही नोकरी बदलणे गरजेचे आहे. परंतु चांगल्या नोकरीसाठीची आवश्यक पात्रता देखील तुम्ही मिळवणे गरजेचे आहे व तुमच्या बॉस सोबत कायम तुम्ही सहकार्याची भूमिका ठेवणे महत्त्वाचे राहते.
2- स्वतःच्या काही सवयी बदला– आपल्यापैकी बऱ्याच जणांचा जास्त खर्च असतो म्हणजेच ते पैसा जास्त खर्च करणारे असतात. यामुळे तुम्ही देखील नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टींच्या खरेदीमध्ये प्राधान्य देऊन खर्च करतात का हे ओळखणे खूप गरजेचे आहे.लग्नाच्या अगोदर जेव्हा आपण नोकरीला असतो तेव्हा एकटे असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जातो.
असे न करता तुम्ही जर गरज आणि आवश्यकतेनुसार खर्च केला तर ते गरजेचे असते व ही सवय तुम्ही अंगी बाणवणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचे हप्ते नियमितपणे भरण्याची सवय लावणे देखील महत्त्वाचे आहे.
बऱ्याचदा पैसा खर्च होऊन जातो व नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. असे होऊ नये म्हणून अगदी सिरीयसली खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळोवेळी तुमचे बँक स्टेटमेंट पाहण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी.
3- बिले वेळेवर चुकवा– आपल्यापैकी बरेच जण वेळेवर बिले भरत नाही. त्यामुळे सर्व बिले वेळेवर भरणे गरजेचे आहे. समजा तुमच्याकडे क्रेडिट कार्डची थकबाकी असेल तर ते ताबडतोब भरा किंवा पर्सनल लोन आणि इतर कर्ज भरण्यासाठी देखील तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन करणे खूप गरजेचे आहे.
तसेच याकरिता तुम्ही खर्च कमी करणे महत्त्वाचे असून खर्चाच्या नियोजनामध्ये तुमच्या आई-वडिलांसाठी देखील काही पैसा खर्च करता येईल याकरिता काही रक्कम बाजूला काढून ठेवणे गरजेचे असते.
पैशाचे एक वैशिष्ट्य असते की तुम्ही ज्या पद्धतीने पैशांचा विनीयोग करता त्याप्रमाणेच पैसे तुमच्याशी नाते तयार करत असते. त्यामुळे सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे पैशाची मैत्री करत खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
4- घरात खर्चासाठी रोकड ठेवा– घरातल्या मोठ्या आणि छोट्या खर्चाची यादी बनवा. आजकाल यूपीआयने पेमेंट करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणे वाढल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला किती पैसा खर्च होतो हे समजत नाही. त्यामुळे पगारदार व्यक्ती असाल तर पगार झाल्यानंतर काही रोख रक्कम घर खर्चाकरिता काढून ठेवणे गरजेचे आहे.
तसेच कर्ज घेण्याचा काही प्लॅनिंग असेल तर खरच कर्जाची आवश्यकता आहे का याचा विचार करूनच त्याबद्दल निर्णय घ्या. महत्वाचे म्हणजे एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेण्याचा विचार चुकून करू नका. तसेच काही नवीन गोष्टी आपल्याकडे हव्यात असा हट्ट टाळून पैसा वाचवा.