Senior Citizen : आपले गुंतवलेले पैसे सुरक्षित असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते, तसेच त्यावर मिळणार परतावा देखील चांगला असावा. अशातच जेष्ठ नागरिक जास्त जोखीम न घेता चांगल्या परताव्याची गुंतवणूक शोधत असतात, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काही बँकांनी फेब्रुवारीपासून त्यांचे एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत, त्यामुळे आता एफडीवरही बंपर परतावा मिळू लागला आहे.
खरं तर, अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी फेब्रुवारीपासून त्यांचे दर सुधारित केले आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना ३ वर्षांच्या एफडीवर 9.50 टक्के व्याज दिले जात आहे. काही सरकारी बँकांनी एफडीवरील व्याजदरही वाढवले आहेत, जिथे ज्येष्ठ नागरिक कोणतीही जोखीम न घेता पैसे गुंतवून चांगले परतावा मिळवू शकतात.
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी देखील जारी केली आहे. बँकेने 2 फेब्रुवारीपासून नवीन दर जाहीर केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 1,001 दिवसांसाठी FD करण्यावर 9.50 टक्के व्याज दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे.
बँकेने 6 महिने ते 201 दिवसांच्या FD वर 9.25 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय 501 दिवसांच्या एफडीवर 9.25 टक्के व्याजही मिळेल.
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब आणि सिंध बँकेने 2 फेब्रुवारी 2024 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवरील व्याजातही वाढ केली आहे. आता 444 दिवसांसाठी FD केल्यास 8.10 टक्के व्याज मिळेल. या विशेष एफडीमध्ये 31 मार्च 2024 पर्यंत गुंतवणूक करता येईल.
करूर वैश्य बँकेने देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एफडीही सुरू केली आहे. बँकेने म्हटले आहे की, 1 फेब्रुवारी 2024 पासून ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांच्या मुदत ठेवींवर 8 टक्के व्याज मिळेल.
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. PNB ने म्हटले आहे की 400 दिवसांच्या FD वर 7.75 टक्के व्याज मिळेल, जे 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहे.
बँकेने 300 दिवसांच्या एफडीवरील व्याजात 0.80 टक्के वाढ केली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याज मिळेल, तर अति ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना 7.85 टक्के व्याज मिळेल.