स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यातल्या त्यात मुंबई, पुणे यासारख्या मेट्रो शहरात घर घ्यायचं या विचारानेच अनेकांना धडकी भरते. मोठ्या शहरांतील घरांचे दर पाहिल्यानंतर घराचं स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय? अशी चिंताही सतावते. अनेकदा मध्यमवर्गीय लोक गृहकर्ज घेऊन घर घेतात. तर काहीजण डाऊन पेमेंटसाठी लागणारी 20 टक्के रक्कम जमा करण्यासाठी गुंतवणूक सुरु करतात. अनेकजण म्यूचुअल फंडांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून दिर्घकालीन गुंतवणूक सुरु करतात. परंतु घर घेण्यासाठी गृहकर्ज घेऊन त्याचे हप्ते भरणं सोप्पे, की एसआयपी करणं सोप्पं? आज हाच विषय आपण समजून घेऊ
होम लोनचं गणित कसं?
समजा, तुम्हाला 50 लाखांचं घर घ्यायचंय. त्यासाठी तुम्ही 50 लाखांचं गृहकर्ज घेतलं. त्यानंतर तुम्हाला घेतलेल्या कर्जासाठी बँकेला सामान्यपणे 8.75 टक्के व्याजदर द्यावा लागतो. म्हणजेच दर महिन्याला 50 लाखांच्या कर्जासाठी 44 हजार 186 रुपयांचा कर्जाचा हफ्ता द्यावा लागेल. हा हप्ता म्हणजे तुमचा ईएमआय. हा एवढा ईएमआय 20 वर्षांसाठी भरावा लागेल. या कर्जावरुन तुम्ही एकूण 56 लाख 4 हजार 529 रुपये व्याज बँकेला द्याल. म्हणजेच हे 50 लाखांचं घर 1 कोटी 6 लाख 4 हजार 529 रुपयांचं होतं.

एसआयपीचा हिशोब कसा असेल?
आता याच 50 लाखांच्या घरासाठीचा एसआयपीचा विचार आपण करुयात. एसआयपीच्या माध्यमातून तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल तर तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून 50 लाखांचा निधी उभा करावा लागेल. आता असं समजून चालूयात की, तुम्ही गृहकर्जाच्या हफ्त्याइतकी म्हणजेच 44 हजार 186 रुपये इतकी रंक्कम एसआयपीमध्ये दर महिन्याला गुंतवली, तर काय होईल? तुम्ही असे केले तर अवघ्या सात वर्षांमध्ये तुमच्याकडे 50 लाख रुपये जमा होतील. हा हिशोब 12 टक्के परताव्याच्या हिशोबाने मांडण्यात आला आहे.
नेमकं काय परवडतं?
म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून 50 लाख रुपये उभे करण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागेल. तर गृहकर्जाच्या माध्यमातून यासाठी 20 वर्षांचा कालावधी लागेल. दोन्हीकडे दर महिन्याला समान रक्कम जमा केली जाईल. मात्र या आकडेमोडीमध्ये एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे एसआयपीमध्ये 12 टक्के परतावा मिळेलच असं ठामपणे सांगता येत नाही. परंतु काहीही असेल तरी एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला घर घेणं परवडणारं आहे.