Mumbai-Nagpur Highspeed Railway:- महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या शहरांना कनेक्टिव्हिटी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काही रस्त्यांची कामे सुरू आहेत तर काही महत्त्वाच्या महामार्गाची कामे प्रस्तावित आहेत. महामार्गांसोबतच काही रेल्वेमार्गांची कामे देखील सुरू असून यामध्ये नवीन रेल्वेमार्ग उभारणी तसेच रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण इत्यादी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. इतकेच नाहीतर काही रेल्वे मार्ग देखील प्रस्तावित आहेत. यामध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडण्याकरिता समृद्धी महामार्गलगत हायस्पीड रेल्वेमार्ग येणाऱ्या काळात उभारला जाईल अशी एक शक्यता निर्माण झाली आहे व त्यासंबंधीची थोडक्यात माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
लवकरच धावणार मुंबई ते नागपूर हायस्पीड रेल्वे?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई ते नागपूर या दोन शहरादरम्यान हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षापासून गुलदस्तात पडून राहिलेला होता. परंतु तो पुन्हा आता चर्चेत आल्याचे दिसून येत आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे 10 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळेस बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गलगत हायस्पीड रेल्वे धावण्याच्या प्रकल्पावर भाष्य केल्याने हा प्रकल्प पुन्हा अजेंड्यावर येणार असे संकेत त्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात हाय स्पीड रेल्वेचा 111 किलोमीटरचा ट्रॅक समृद्धी महामार्गलगत बांधणीचा विचार व्हायला जवळपास साडेतीन वर्ष झालेली आहेत. या रेल्वेमार्गचा डीपीआर नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून तयार करण्यात येणार होता.

कसा असेल हा प्रस्तावित प्रकल्प?
या हायस्पीड रेल्वेमार्गाची एकूण लांबी साधारणपणे 749 किलोमीटर असेल व या मार्गावर बारा ते चौदा स्थानके असतील. मुंबई ते नागपूर रेल्वेमार्गामुळे जवळपास दहा जिल्हे एकमेकांना जोडले जातील व यामधील वाहतूक जलद होऊन कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होईल. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या रेल्वेमार्गाकरिता साधारणपणे 1,245.61 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गावर ताशी 330 ते 350 किलोमीटर वेगाने रेल्वे धावू शकणार आहे व प्रवासी वाहतूक क्षमता 750 इतकी राहणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण 15 बोगदे असतील व एकूण बोगद्यांची लांबी साधारणपणे 25.23 किलोमीटर आहे. जर मुंबई ते नागपूर हायस्पीड रेल्वेमार्गावरील रेल्वे स्टेशन बघितले तर ते अजनी, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नासिक, घोटी बुद्रुक, शहापूर आणि ठाणे अशा 14 ठिकाणी रेल्वे स्टेशन उभारले जाणार आहेत.