अक्षय्य तृतीयाला सोनं खरेदी शुभ का मानलं जातं?, जाणून घ्या धार्मिक कारण आणि शुभ मुहूर्त 

अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जाणारा सण आहे. यंदा 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. या दिवशी सोनं खरेदी, पूजन आणि दान केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो.

Published on -

Akshaya Tritiya 2025 | हिंदू धर्मातील महत्वाचा सण अक्षय्य तृतीया यंदा 30 एप्रिलरोजी साजरा होईल.  याला ‘अखा तीज’ असेही म्हणतात. प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो. अक्षय्य तृतीया या शब्दाचा अर्थ आहे “कधीच न संपणारे”, म्हणूनच या दिवशी जे काही कार्य केलं जातं, त्याचे फळ अयशस्वी होत नाही, असे मानले जाते.

या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. पूजेसाठी शुभ मुहूर्त 30 एप्रिल रोजी पहाटे 5:41 वाजल्यापासून दुपारी 12:18 पर्यंत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी केलेले दान, पूजन आणि खरेदी दीर्घकालीन लाभ देणारे ठरते. विशेषतः या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंचा क्षय कधीच होत नाही आणि त्या घरात संपत्ती वाढवतात.

धार्मिक कारण-

पौराणिक कथांनुसार, सत्ययुगाची सुरुवात अक्षय्य तृतीया या दिवशीच झाली होती. तसेच, महाभारताचे लेखन याच दिवशी वेदव्यासांनी सुरू केल्याचे मानले जाते. याच दिवशी भगवान विष्णूंच्या सहाव्या अवताराचा म्हणजेच परशुराम यांचा जन्म झाल्यामुळे हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो. भगवान परशुराम हे ऋषी जमदग्नी आणि राजकुमारी रेणुकेचे पुत्र होते.

या दिवशी केलेले दान पुण्याचा विशेष महिमा आहे. विशेषतः जलकुंभ, गूळ, तांदूळ, वस्त्र, फळे, आणि ग्रंथांचे दान केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी आणि पुण्य प्राप्त होते. दानामध्ये विशेषतः गरीबांना अन्न आणि पाणी देण्याचे महत्त्व अधिक मानले जाते. सूर्योदयानंतर केलेले पूजन आणि दान अत्यंत शुभ मानले जाते.

शुभ मुहूर्त 

सणाच्या दिवशी अभिजीत मुहूर्त नसला तरी विजय मुहूर्त 2:31 ते 3:24 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. त्याशिवाय संधिप्रकाश वेळ 6:55 ते 7:16 या वेळेत आहे आणि दिवसभर ‘सर्वार्थ सिद्धी योग’ असल्याने कोणतेही शुभ कार्य करता येते.

या सर्व गोष्टी लक्षात घेता, अक्षय्य तृतीया फक्त धार्मिकदृष्ट्या नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही खूप मोठा सण आहे. तो श्रद्धा, समृद्धी, आणि नवा आरंभ यांचं प्रतीक मानला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News