20 वर्षांचा संसार तुटणार?, बॉक्सर मेरी कोमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव; घटस्फोटाच्या चर्चा वाढल्या

Mary Kom divorce Rumors | भारताची प्रख्यात महिला बॉक्सर मेरी कोम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बदलाशी संबंधित आहे. सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे की मेरी कोम तिचा पती करंग ओनलरपासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. या दाव्यांमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, कारण त्यांच्या विवाहाला 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि त्यांचं नातं नेहमीच आदर्श मानलं जात होतं.

मेरी कोम आणि करंग ओनलर यांनी 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर विवाह केला होता. दोघंही तीन मुलांचे पालक आहेत आणि काही काळापूर्वी त्यांनी एका मुलीला दत्तकही घेतलं आहे. इतकं सुंदर आणि स्थिर आयुष्य असतानाही त्यांच्या नात्यात फूट का पडतेय, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

2022 पासून नात्यात तणाव?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 पासूनच दोघांमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आलाय की, मेरी कोम दुसऱ्या नात्यात आहे. मात्र या वृत्तांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. विशेष म्हणजे, मेरी कोमने या सर्व अफवांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे संशय अधिकच वाढतो आहे.

करंग ओनलरने अलीकडेच एका विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतला होता, पण त्यात त्यांचा पराभव झाला. या पराभवामुळे त्यांना जवळपास 2 ते 3 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. हाच घटस्फोटामागील मुख्य कारणांपैकी एक असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे दोघांमध्ये मतभेद वाढले आणि त्यांच्या नात्यावर ताण आला.

घटस्फोटाच्या चर्चा-

मेरी कोम सध्या हरियाणातील फरीदाबादमध्ये मुलांसह राहत असल्याचं सांगितलं जातं, तर करंग ओनलर दिल्लीमध्ये राहतात. वेगवेगळं राहणं, आर्थिक अडचणी, वैचारिक मतभेद यामुळे त्यांच्या नात्याचं अंतर वाढलं आहे. अजूनतरी दोघांनी घटस्फोटाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण जर हे वृत्त खरं ठरलं, तर हे भारताच्या सर्वात चर्चित क्रीडापटू जोडप्यांपैकी एकाच्या नात्याचा अंत असेल.