RBI Repo Rate |भारतातील घरांच्या किमती 2025 मध्ये झपाट्याने वाढल्या आहेत. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये, विशेषत: दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि कोलकातामध्ये घरांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, दिल्ली-एनसीआरमध्ये घरांचा दर 12% ने वाढून 5,370 रुपये प्रति चौरस फूट झाला आहे, तर मुंबईत तो 6% ने वाढून 8,360 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये 9% वाढीसह 3,947 रुपये प्रति चौरस फूट इतका दर झाला आहे.
रेपो रेट कमी होणार?
या महागाईमुळे सर्वसामान्य घर खरेदीदारांसाठी स्वप्नातलं घर घेणं अधिक कठीण झालं आहे. महागड्या घरांसाठी विक्रीत वाढ दिसत असली तरी, कमी बजेटच्या घरांची मागणी घटली आहे. एका प्रसिद्ध अहवालानुसार, 50 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री 9% ने घसरून 21,000 युनिट्सवर आली आहे.

आरबीआयने फेब्रुवारी 2025 मध्ये रेपो रेट 0.25% ने कमी करून 6.25% केला होता. आता पुन्हा 7 ते 9 एप्रिलदरम्यान होणाऱ्या पतधोरण बैठकीत आणखी व्याजदर कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक आणि तज्ज्ञ यावेळी मोठ्या अपेक्षेने आहेत.
काय बदल होणार?
विशेषतः मध्यमवर्गीयांना आणि पहिल्यांदाच घर घेणाऱ्या ग्राहकांना याचा थेट फायदा होऊ शकतो. व्याजदर कपात झाल्यास गृहकर्ज परवडणारे होईल आणि घर खरेदीची क्षमता वाढेल. तसेच जर रेपो दर 6% पर्यंत खाली आला आणि बँकांनी लवकर कारवाई केली, तर गृहकर्जाची मागणी वाढू शकते.
तर काहींच्या मते सध्याच्या घडीला महागाई नियंत्रणात आहे. त्यामुळे आता आरबीआयने आर्थिक वृद्धीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. दरम्यान, 2025 च्या सुरुवातीला घरांची विक्री आणि पुरवठा कमी झाला असून, गृहकर्ज स्वस्त झाल्यास विक्रीत मोठी वाढ होऊ शकते.