क्रिकेटचा एकदिवसीय फॉरमॅट हा कसोटीची शिस्त आणि टी-20 ची आक्रमकता यांचं विलक्षण मिश्रण आहे. इथे खेळाडूंसमोर वेळेचं बंधन असतं, पण मोठी खेळी करण्याचीही संधी. या मर्यादित षटकांच्या खेळात काही फलंदाजांनी इतक्या वेगात शतकं ठोकली आहेत, की त्यांची नावं ऐकूनच थक्क व्हायला होतं. विशेष म्हणजे, या यादीत दोन वेळा एका खेळाडूचं नाव आहे आणि दुर्दैवाने, भारताचा एकही खेळाडू इथे नाही.
एबी डिव्हिलियर्स

या थरारक यादीची सुरुवात होते दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सपासून. क्रिकेट विश्वात ‘मिस्टर 360 डिग्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिव्हिलियर्सने 2015 साली जोहान्सबर्गमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ 31 चेंडूंमध्ये शतक ठोकून विक्रम प्रस्थापित केला. 149 धावांच्या त्या खेळीत त्याने 16 षटकार आणि 9 चौकार मारले होते, ही फटकेबाजी म्हणजे एका वादळाचा अनुभव होता.
कोरी अँडरसन
त्यानंतर येतो न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज कोरी अँडरसन. 1 जानेवारी 2014 रोजी त्याने क्वीन्सटाऊनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 36 चेंडूत शतक ठोकून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या. त्याच सामन्यात त्याचा साथीदार जेसी रायडरनेही 46 चेंडूत शतक ठोकून धडाकेबाज सुरुवात केली होती.
शाहिद आफ्रिदी
पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी याने या यादीत दोन वेळा आपली छाप सोडली आहे. त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात, केवळ 18 वर्षांचा असताना, 37 चेंडूत त्याने श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकून खळबळ उडवली. त्यानंतर 2005 मध्ये भारताविरुद्ध कानपूरमध्ये, त्याने पुन्हा 45 चेंडूत शतक झळकावले. आफ्रिदीच्या फटकेबाजीची ताकद आणि सातत्य हे खरंच उल्लेखनीय आहे.
ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेलदेखील मागे नाही. 2023 च्या विश्वचषकात दिल्लीमध्ये, त्याने नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूत शतक झळकावलं. त्याच्या 106 धावांच्या खेळीत 8 षटकार आणि 9 चौकार होते, हा खरंच एक ‘मॅड मॅक्स’ शो होते.
आसिफ खान, मार्क बाउचर
थोडं आश्चर्य वाटावं अशी कामगिरी केली युएईच्या आसिफ खानने. 2023 मध्ये नेपाळविरुद्ध त्याने केवळ 41 चेंडूत शतक ठोकून नाव मोठ्या मंचावर कोरलं. याच यादीत आणखी एक नाव उठून दिसतं. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक मार्क बाउचर, ज्याने 2006 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 44 चेंडूत शतक ठोकून त्याची फलंदाज म्हणून ताकद दाखवून दिली.
ब्रायन लारा
वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, ज्याची शैली आणि दर्जा जगजाहीर आहे, त्यानेही 45 चेंडूत बांगलादेशविरुद्ध शतक ठोकलं होतं. त्याच्या 117 धावांच्या खेळीत 18 चौकार होते. ही यादी पाहताना मनात थोडी खंत जरूर वाटते, कारण इथे भारताचा एकही फलंदाज नाही.