आजच्या धावपळीच्या जीवनात केस गळण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की अनेकजण केवळ आरशात पाहूनच हताश होतात. केसांची पकड सैल होणं, खोलीत किंवा बाथरूममध्ये केसांचे गुच्छ सापडणं ही आता अगदी सामान्य बाब झाली आहे. मात्र, हे सामान्य वाटलं तरी त्यामागचं कारण गंभीर असू शकतं. चुकीची आहारशैली, वाढलेले प्रदूषण, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि पोषणाचा अभाव. पण यावर कोणतंही महागडं उत्पादन वापरण्याऐवजी, जर काहीतरी नैसर्गिक आणि परिणामकारक उपाय मिळाला, तर?

असाच एक देशी, पण प्रभावी उपाय सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय ठरतो आहे आणि तो म्हणजे आवळ्याचा खास रस. एका प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरने नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी केस गळती रोखण्यासाठी हा साधा पण जबरदस्त उपाय सांगितला आहे. आणि हो, ही फक्त केसांसाठी नव्हे, तर एकंदर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
‘असा’ बनवा आवळा टॉनिक
हा घरगुती उपाय तयार करणं खूप सोपं आहे. तुम्हाला लागतील फक्त चार गोष्टी 2 ताजे आवळे (किंवा आवळा पावडर), अर्धा बीट, थोडासा आल्याचा रस आणि एक चिमूट काळी मिरी पावडर. प्रथम आवळा आणि बीट मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि त्याचा रस काढा. त्यानंतर त्यात आल्याचा रस आणि काळी मिरी घालून नीट मिसळा. हा ताजा रस रोज सकाळी प्यायल्याने, केवळ केस गळती थांबत नाही, तर केस मुळांपासून मजबूतही होतात.
या रसामध्ये जे पोषक घटक आहेत, ते खरंच लक्षात घेण्यासारखे आहेत. आवळा हे व्हिटॅमिन-C चं भांडार आहे, ज्यामुळे केसांना नुसतं पोषण मिळतं असं नाही, तर ते नव्याने वाढण्यासही मदत होते. अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि केसांचं अकाली गळणं किंवा पांढरं होणं थांबवतात. बीटमध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरात रक्ताभिसरण सुधारून केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवतात. आलं आणि काळी मिरी शरीरातील दाह कमी करतात आणि पचनसंस्थेला बळकट करतातहे सगळं केसांच्या आरोग्यासाठी अप्रत्यक्षपणे उपयुक्त ठरतं.
महत्वाचा सल्ला
एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी लागेल, हा उपाय जादूची कांडी नाही. रोजचं सेवन, संयम आणि चांगली जीवनशैली या सगळ्यांचा एकत्रित परिणामच केसांवर दिसून येतो. पण जर तुम्ही हे काही दिवस सातत्याने केलं, तर तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील.