MK-84 पेक्षाही 3 पट घातक, ‘या’ देशाने बनवला जगातील सर्वात विध्वंसक नॉन-न्यूक्लियर बॉम्ब!

जर जगातील सर्वांत विनाशकारी बॉम्बांचा उल्लेख झाला, तर आपल्याला लगेच अमेरिकेचा MK-84 आठवतो. पण आता तुर्कीने असा एक पारंपरिक बॉम्ब तयार केला आहे जो MK-84 पेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. ‘GAZAP’ नावाचा हा बॉम्ब नुकताच तुर्कीने जगासमोर सादर केला असून, सध्या तो संपूर्ण जागतिक संरक्षण तज्ज्ञांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

‘GAZAP बॉम्ब’ची वैशिष्ट्ये

इस्तंबूलमध्ये सुरू असलेल्या IDEF 2025 या आंतरराष्ट्रीय संरक्षण उद्योग प्रदर्शनात तुर्कीने ‘GAZAP’ नावाचा अत्याधुनिक नॉन-न्यूक्लियर बॉम्ब पहिल्यांदाच प्रदर्शित केला. याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं विनाशकारी सामर्थ्य, जे MK-84 पेक्षा जवळपास तीनपट अधिक आहे. हा बॉम्ब तब्बल 970 किलो वजनाचा आहे आणि विशेष म्हणजे तो पारंपरिक बॉम्ब असूनही त्याच्या विध्वंसक क्षमतेमुळे तो अणुबॉम्बच्या काही टप्प्यांपर्यंत पोहोचतो, असं सैनिकी तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

GAZAP मध्ये एक विशेष फ्रॅगमेंटेशन तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे, ज्यामुळे स्फोटाच्या क्षणी त्यातून 10,000 हून अधिक लहान तुकडे निर्माण होतात. हे तुकडे अत्यंत वेगाने चारही दिशांनी पसरतात, ज्यामुळे एखाद्या विशिष्ट जागेवरच नव्हे, तर आसपासच्या मोठ्या परिसरावरही जबरदस्त परिणाम होतो. ही बाब युद्धाच्या रणांगणात शत्रूला धक्का देणारी ठरू शकते.

या बॉम्बचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो F-16 सारख्या लढाऊ विमानातून सहज टाकता येतो. यामुळे तो केवळ शक्तिशालीच नाही, तर लवचिक व वापरायला सोपा असल्याचंही मानलं जात आहे. युद्धाच्या धर्तीवर हे फार मोठं सामर्थ्य मानलं जातं, कारण अशा बॉम्ब्समुळे हवाई हल्ल्याची परिणामकारकता वाढते.

NEB-2 ‘Ghost’

GAZAP च्या बरोबरीने तुर्कीने NEB-2 ‘Ghost’ नावाचा बंकर बस्टर बॉम्बही याच प्रदर्शनात सादर केला आहे. यामध्ये 7 मीटरपर्यंत खोल काँक्रीट भेदण्याची क्षमता आहे. म्हणजेच शत्रूने जरी जमिनीत खोल बंकर बनवले असले, तरीही हे शस्त्र त्यांच्यावर नेमकं आणि प्रभावीपणे हल्ला करू शकतं. हे पाहता तुर्की आता आधुनिक युद्धशक्तीच्या शर्यतीत अधिक आत्मनिर्भर आणि आक्रमक बनत असल्याचं स्पष्ट होतं.

एकेकाळी संरक्षण क्षेत्रात पूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून असलेला तुर्की, आज स्वतःच्या संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर जागतिक शक्तींना आव्हान देत आहे. GAZAP बॉम्ब ही त्याची ठळक उदाहरणं आहे. हे पाहून आता अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या देशांनी तुर्कीच्या या प्रगतीकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे.