5 लाख वर्षांच्या ज्वालामुखीने पुन्हा उधळला लावा, 2025 मध्ये पुन्हा संकटाचं सावट?; जगभरात भीतीचं वातावरण

Published on -

इटलीतील सिसिली बेटावर वसलेला एटना पर्वत, केवळ युरोपमधील सर्वात उंच आणि सक्रिय ज्वालामुखीच नाही, तर तो एक असा नैसर्गिक राक्षस आहे जो हजारो वर्षांपासून लावा ओकत आहे. आता पुन्हा एकदा तो जागा झाला आहे आणि त्याच्या हिंसक स्फोटांनी जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 2 जून 2025 रोजी झालेल्या त्याच्या ताज्या उद्रेकाने आकाश काळोख करून टाकलं, आणि त्या थरारक दृश्याने संपूर्ण जग हादरून गेलं.

 

या स्फोटात राखेचे आणि धुराचे प्रचंड ढग सुमारे 6,000 मीटर उंच आकाशात पोहोचले. या भीषण घटनेमुळे पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. काही क्षणात सगळीकडे गडगडाट, राख आणि धुराचे साम्राज्य पसरले. लोक जीव वाचवण्यासाठी धावत होते आणि सिसिलीच्या त्या भागात एका क्षणात संपूर्ण हवामान बदलले.

एटना पर्वताखालील ज्वालामुखी

एटना पर्वताचा इतिहासही तितकाच थरारक आहे. युनेस्कोच्या मते, हा ज्वालामुखी सुमारे 500,000 वर्ष जुना आहे आणि त्याच्या उद्रेकांचा मागील 2,700 वर्षांपासूनचा रेकॉर्ड आहे. तो सुमारे 3,400 मीटर उंच आहे आणि 100 मैलांपेक्षा अधिक विस्तीर्ण आहे. या पर्वताचे सौंदर्य जितके अद्वितीय आहे, तितकीच त्याची क्रूरताही वेळोवेळी समोर येते.

एटना इतका सक्रिय असण्यामागे कारण भूगर्भातील दोन मोठ्या प्लेट्सआफ्रिकन आणि युरेशियन यांच्या टक्करामध्ये दडलेले आहे. या प्लेट्सच्या घर्षणामुळे या भागात भूकंप आणि ज्वालामुखी क्रिया सतत सुरू असते. त्यामुळे एट्नामधून वारंवार लावा आणि धूर बाहेर पडतो.

इतिहासात 1669 साली झालेला एट्नाचा उद्रेक सर्वात भीषण मानला जातो. तेव्हा तब्बल 14 गावे लाव्याने झाकली गेली आणि 20,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेने त्या काळात भयंकर विध्वंस घडवला होता. आणि त्या घटनेच्या आठवणी अजूनही सिसिलीच्या जमिनीवर कोरल्या गेल्यासारख्या वाटतात.

एट्नाचा उद्रेक

21व्या शतकातही एटना शांत बसलेला नाही. 2001, 2002-03, 2008-09, 2018, 2021 आणि आता 2025 मध्ये त्याचे अनेक वेळा उद्रेक झाले आहेत. विशेषतः 2021 मध्ये, तीन आठवड्यांत 11 वेळा त्याने लावा ओकला होता. 2024 आणि 2025 मधील उद्रेकांनी तर आंतरराष्ट्रीय विमानतळही बंद करावे लागले होते.

2 जून 2025 रोजीच्या स्फोटात आग्नेय भागातील विवर कोसळल्याने ताशी 150 किमी वेगाने पायरोक्लास्टिक प्रवाह वाहू लागले. हे इतके वेगवान आणि उष्ण होते की, आसपास असलेल्या लोकांनी थेट पळ काढला. तरीही, सिसिली प्रशासनाने तेथील लोकसंख्येसाठी स्थिती नियंत्रणात असल्याचे जाहीर केले.

एटनामधील पर्यटन

एटना पर्यटनासाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या ज्वालामुखीला पाहण्यासाठी येतात. मात्र, अशा स्फोटांच्या वेळी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी धावपळ उडते. जून 2025 मध्येही हेच चित्र दिसले. राखेच्या धुक्यात हरवलेली माणसं, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं, आणि सोशल मीडियावर त्याचे जगभर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ.

या ज्वालामुखीचा आणखी एक धोकादायक पैलू म्हणजे कार्बन डायऑक्साइडचं प्रचंड उत्सर्जन. कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, एटना पृथ्वीवरील सर्वात जास्त CO2 सोडणारा सक्रिय ज्वालामुखी आहे, आणि त्यामुळे तो हवामान बदलासाठी एक मोठा धोका ठरतो.

पौराणिक कथा

एट्नाला वेगळं बनवणाऱ्या गोष्टींमध्ये पौराणिक कथा देखील येतात. ग्रीक पौराणिक कथेनुसार, झ्यूसने टायफॉन नावाच्या राक्षसाला या ज्वालामुखीखाली कैद केलं होतं. त्याच्या श्वासामुळेच ज्वालामुखीचा लावा बाहेर पडतो, असं मानलं जातं. हेफेस्टसअग्नीचा देव याचे फोर्जसुद्धा इथे असल्याचं सांगितलं जातं.

तरीही, इतक्या धोक्याच्या पार्श्वभूमीवरही एटना एक आकर्षण राहिलं आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत 2013 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. पार्को डेल एटना या संरक्षित क्षेत्राचा तो भाग आहे आणि विविध टूर कंपन्या पर्यटकांना खास सुरक्षा उपायांद्वारे या अद्वितीय ज्वालामुखीचा अनुभव घेण्याची संधी देतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!