आजच्या आधुनिक लढाईच्या रणभूमीत युद्ध केवळ जमिनीवर किंवा आकाशात मर्यादित राहिलेले नाही. आता समुद्राचाही समावेश झाला आहे, आणि त्यामुळे नौदलांची ताकद किती भक्कम आहे, हे लढाऊ विमानांवरून ठरत आहे. हे विमान केवळ रणनौकांवर तैनात नसतात, तर शत्रूच्या जमिनीवर, हवाई दलावर आणि समुद्री लक्ष्यांवरही अचूक मारा करण्यास सक्षम असतात. चला जाणून घेऊया जगातील 6 अशा घातक नौदल लढाऊ विमानांविषयी, ज्यांच्याशी टक्कर द्यायला शत्रूंनाही अनेकदा विचार करावा लागतो.
F-35C लाइटनिंग II

अमेरिकेचे हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान अत्याधुनिक स्टील्थ टेक्नॉलॉजीने सज्ज आहे. शत्रूच्या रडारपासून लपून मारक मोहिमांमध्ये उतरते आणि आपल्या बहुउद्देशीय क्षमतांमुळे आकाश, जमीन आणि समुद्रावर नियंत्रण मिळवते. याच्या सेन्सर्स, डेटा लिंक आणि अचूकतेमुळे ते एकात्मिक युद्धशक्ती बनते.
राफेल
डसॉल्ट राफेल हे फ्रान्सचे सर्वभूमिका लढाऊ विमान म्हणजे आधुनिक युद्धकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हवेतून हवाई मारा, जमिनीवरील लक्ष्यांवर आक्रमण, अण्वस्त्र वाहून नेणे आणि अनेक प्रकारचे युद्धप्रकार हे एकट्याने हाताळू शकते. त्यामुळे ते नौदलात अत्यंत विश्वासार्ह मानले जाते.
सुखोई एसयू-33
रशियाचे हे विमान मोठ्या प्रमाणात शस्त्रांनी सज्ज असून लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी तयार केले गेले आहे. याचे डिझाइन हवाई श्रेष्ठता राखण्यासाठी केले गेले असून शत्रूच्या विमानांवर तीव्र हल्ला करून त्यांना निष्क्रिय करण्याची ताकद याच्या क्षमतेत आहे.
जे-15 फ्लाइंग शार्क
‘फ्लाइंग शार्क’ या नावातच या लढाऊ विमानाची दहशत दिसून येते. चीनच्या पहिल्या वाहक आधारित लढाऊ विमानाने बहुपरिमाणीय मोहिमांसाठी आपली क्षमता सिद्ध केली आहे. हवाई हल्ले, जमिनीवरील लक्ष्यांवर मारा आणि समुद्रावरील नियंत्रण यात याचा हातखंडा आहे.
मिग-29के
भारताचे मिग-29के हे दोन इंजिनांनी सुसज्ज आणि अचूक मारक शक्ती असलेले बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. याच्या प्रगत क्षेपणास्त्रांमुळे आणि जलद हालचालींमुळे ते नौदलात एक प्रमुख भूमिका बजावते. भारतीय नौदलातील आयएनएस विक्रमादित्य आणि विक्रांतवर याची तैनाती झाली आहे.
एफ/ए-18 सुपर हॉर्नेट
बोईंग कंपनीचे हे विमान अमेरिकन नौदलासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याची हवाई, जमिनीवर आणि समुद्रातील लक्ष्यांवर अचूक मारा करण्याची क्षमता, त्याला जगातील सर्वात घातक नौदल लढाऊ विमानांमध्ये स्थान मिळवून देते. हे विमान अनेक युद्धांमध्ये आपली ताकद सिद्ध करीत आले आहे.