भारतीय रेल्वेचा 6 वर्षांचा डेटा उघड! दर मिनिटाला किती प्रवासी ट्रेनमध्ये चढतात?, आकडे ऐकून विश्वासच बसणार नाही

Published on -

रेल्वे स्टेशनवर उभं राहून एखादी गाडी प्लॅटफॉर्मवर शिरताना पाहा, आणि त्या दरवाज्यांमधून आत शिरणाऱ्या लोकांची संख्या मोजायचा प्रयत्न करा, ऐकूनच हे अशक्य वाटते. दर मिनिटाला शेकडो लोक गाडीत चढतात आणि उतरतात, आणि हेच आपल्याला दररोज जाणवत असलं तरी यामागचा खरा आकडा ऐकला की आपण थक्क होतो. भारतीय रेल्वेचा गेल्या 6 वर्षांचा प्रवासी डेटा समोर आला आहे, आणि तो खरंच जबरदस्त आहे.

कोरोना काळात रेल्वे स्थानकं निर्मनुष्य झाली होती, डब्बे रिकामे राहिले होते, आणि रोज कोट्यवधी लोकांना घेऊन धावणाऱ्या गाड्याही थांबल्या होत्या. पण जसजसा काळ सरत गेला, तसतशी हीच रेल्वे पुन्हा धावू लागली आणि नेहमीच्या पेक्षा अधिक वेगात. विशेषतः दुर्गा पूजा, दिवाळी, छठ, महाकुंभ अशा सण-उत्सवांच्या काळात रेल्वेने विशेष गाड्या सोडून लाखो प्रवाशांना त्यांच्या गावी नेण्याची व्यवस्था केली.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला खुलासा

भारतीय रेल्वे ही काही फक्त गाड्या चालवणारी यंत्रणा नाही, ती लाखो लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गेल्या काही वर्षांत या व्यवस्थेने केवळ तांत्रिकदृष्ट्या नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही मोठी झेप घेतली आहे. वंदे भारत आणि अमृत भारतसारख्या आधुनिक गाड्या सुरू करून, जुन्या ट्रॅकचं दुहेरीकरण करून, स्थानकांचा चेहरामोहरा बदलून रेल्वेने लोकांसाठी प्रवास अधिक सुकर केला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी संसदेत रेल्वेमंत्र्यांना एक साधा प्रश्न विचारला. 2019 पासून किती लोकांनी भारतीय रेल्वेने प्रवास केला? आणि या प्रश्नावरून एक वेगळंच चित्र समोर आलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, रेल्वे प्रवास ही काही स्थिर गोष्ट नाही. सणासुदीला गर्दीचा महापूर असतो, तर बाकीच्या दिवशी काही मार्ग अगदी निवांत असतात. त्यामुळे प्रत्येक दिवशीचं गणित वेगळं असतं.

6 वर्षांची रेल्वे प्रवासी आकडेवारी

 

पण आकडे जे सांगतात, ते खरंच मोठं चित्र उभं करतात. आर्थिक वर्ष 2019-20 पासून 2024-25 पर्यंत जवळपास 3,349 कोटी प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला. यामध्ये 418 कोटी प्रवासी राखीव डब्यांमधून तर तब्बल 2,931 कोटी प्रवासी जनरल डब्यांमधून प्रवास करत होते. म्हणजे भारतात अजूनही बहुसंख्य लोक जनरल कोचमध्ये प्रवास करतात आणि हीच गोष्ट रेल्वेच्या सामाजिक भूमिकेची साक्ष देणारी आहे.

सणांच्या काळात रेल्वेने प्रवाशांची वाढती गरज ओळखून विशेष गाड्या चालवल्या. उदाहरणार्थ, 1 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या दोन महिन्यांत, दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठच्या काळात 7,990 विशेष गाड्यांच्या फेऱ्या झाल्या, ज्यात सुमारे 1.8 कोटी लोकांनी प्रवास केला. त्यानंतर महाकुंभच्या काळात, 13 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत 17,300 हून अधिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या, आणि 4.24 कोटी प्रवाशांना प्रवासाची सुविधा मिळाली.

जनरल कोचची आकडेवारी

 

जर आपण जनरल कोचमध्ये प्रवास करणाऱ्यांचा तपशील पाहिला, तर तोसुद्धा बोलका आहे. 2020-21 या कोविड वर्षात 99 कोटी प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला. त्यानंतर 2021-22 मध्ये 275 कोटी, 2022-23 मध्ये 553 कोटी, 2023-24 मध्ये 609 कोटी आणि 2024-25 मध्ये हा आकडा 651 कोटींपर्यंत पोहोचला. या संख्यांमधून स्पष्ट होतं की सामान्य लोकांसाठी रेल्वे हा अजूनही सगळ्यात स्वस्त, सोयीस्कर आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe