67 ट्रॅक आणि 44 प्लॅटफॉर्म…’हे’ आहे जगातील सर्वात रहस्यमय आणि मोठे रेल्वे स्टेशन! गिनीज रेकॉर्डमध्येही झालीय नोंद

Published on -

काही शहरं अशी असतात, जी तुम्हाला केवळ त्याच्या उंच इमारती किंवा चकचकीत रस्त्यांमुळे नाही, तर तिथल्या एका रेल्वे स्थानकामुळेच विस्मयात टाकतात. न्यू यॉर्कसारख्या शहराची ओळख फक्त स्टॅच्यू ऑफ लिबर्टी किंवा टाइम्स स्क्वेअरपुरती मर्यादित नाही, तर इथल्या ‘ग्रँड सेंट्रल टर्मिनल’ या ऐतिहासिक रेल्वे स्थानकामुळेही आहे.

‘ग्रँड सेंट्रल टर्मिनल’

या भव्य स्टेशनची रचना 1903 मध्ये सुरू झाली आणि तब्बल 10 वर्षांनी, 1913 मध्ये ते प्रवाशांसाठी उघडण्यात आलं. त्याकाळी याचं बांधकाम करणं म्हणजे वास्तूशास्त्रातलं एक चमत्कारच मानलं गेलं होतं. दोन नामवंत आर्किटेक्चर फर्म्स रीड अँड स्टेम आणि वॉरेन अँड वेटमोर यांनी मिळून ही वास्तू घडवली आणि तेव्हापासून हे स्थानक न्यू यॉर्कच्या हृदयात घट्ट रुजलं आहे.

आजच्या घडीला या टर्मिनलमध्ये एकूण 44 प्लॅटफॉर्म आहेत, जे 67 रेल्वे ट्रॅकना जोडलेले आहेत. दिवसातून जवळपास 660 रेल्वे गाड्या येथे थांबतात, काही मिनिटांसाठी, काही तासांसाठी, तर काही फक्त दुसऱ्या शहरांत जाण्यासाठी. इतक्या वर्दळीमुळे हे स्टेशन कधीही निवांत नसतं. पण त्याचसोबत, लोकं केवळ प्रवासासाठीच नव्हे, तर या स्थानकाची भव्यता पाहण्यासाठीही येथे गर्दी करतात.

टर्मिनलची वैशिष्ट्ये

या टर्मिनलचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं ‘लॉस्ट अँड फाउंड’ सेंटर. दरवर्षी जवळपास 19,000 वस्तू या स्थानकावर हरवतात. म्हणजे एखादं घड्याळ, एक लहान बॅग, किंवा अगदी चष्माही. आणि त्या सगळ्या गोष्टी नीट नोंदवून, त्यांना परत मिळवून देण्याचं काम इथलं प्रशासन अत्यंत प्रामाणिकपणे करतं. हाच अनुभव अनेक लोकांना इथल्या व्यवस्थेवर विश्वास ठेवायला भाग पाडतो.

पण या स्टेशनचं खरं रहस्य लपलंय एका गुप्त प्लॅटफॉर्ममध्ये.प्लॅटफॉर्म नंबर 61 जो कुठल्याही सामान्य प्रवाशासाठी कधीच उघडला जात नाही. असं म्हणतात की अमेरिकेचे माजी राष्ट्रपती फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांनी या गुप्त मार्गाचा वापर केला होता, जेणेकरून त्यांच्या आरोग्याबद्दल कुणालाही कल्पना येऊ नये.

या सगळ्यामुळे ‘ग्रँड सेंट्रल टर्मिनल’ केवळ एक रेल्वे स्थानक न राहता न्यू यॉर्क शहराच्या आत्म्याचा एक भाग बनलं आहे. इथं इतिहास आहे, वास्तू सौंदर्य आहे, आणि लोकांच्या आठवणी आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव असलेलं हे स्थानक पाहताना कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. रेल्वे स्टेशन म्हणजे केवळ गाड्या येण्या-जाण्याचं ठिकाण नसतं, हे इथं आलं की प्रकर्षानं जाणवतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!