अहिल्यानगर- शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील महापालिकेच्या जागेत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून शंभर बेडचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येत आहे. इमारतीचे काम आजमितीस ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नगरकरांना अद्यायवत आरोग्य सेवा मिळणार आहे.
अहिल्यानगर शहरात महापालिकेचे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय नगरकरांच्या सेवेत आहे. मात्र, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात अपुऱ्या जागेमुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे मोठ्या जागेत अद्ययावत सुविधा असणारे रुग्णालय असावे, यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा केला होता.

आता बुरूडगाव रस्त्यावरील चाहुराणा बुद्रुक येथे सर्व्हे ४६ १ या जागेमध्ये अद्यावत रुग्णालय बांधण्यात आले आहे. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी २६.८४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. १०० बेडचे रुग्णालय असून, इमारतीचे सिव्हील वर्क सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. फर्निचर व अन्य साहित्य खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
त्यासाठी तीन कोटी व दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उर्वरित कामांना गती देण्यात आली आहे. रुग्णालय उभारणीनंतर आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी इतर वैद्यकीय कर्मचारी, लॅब टेक्निशियन व इतर मनुष्यबळ बाह्यस्त्रोत घेण्यात येणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.
असे आहे हॉस्पिटल तळघरात पार्किंग, तळ मजल्यावर ओपीडी व लॅब, पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जनरल वार्ड, आयसीयू व ऑपरेशन थिएटर, तिसऱ्या मजल्यावर प्रायव्हेट रुम, डॉक्टर कक्ष, चौथ्या मजल्यावर कँटीन असणार आहे.
या मिळणार सुविधा शंभर बेडची व्यवस्था, सिटीस्कॅन विभाग, शस्त्रक्रिया, अतिदक्षता, मेडिकल रूम, बाह्य रुग्ण विभाग आंतर रुग्ण विभाग बुरूडगाव रस्त्यावरील महापालिकेच्या अद्ययावत रुग्णालयाचे काम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. रंगकाम व अन्य किरकोळ काम प्रगतीपथावर आहे. लवकरच महापालिकेचे हे रुग्णालय अहिल्यानगरकरांच्या सेवेत दाखल होईल.
– यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक, अहिल्यानगर महापालिका
अहिल्यानगरमधील नागरिकांसाठी महापालिकेचे हक्काचे अद्ययावत रुग्णालय होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला अल्पदरात आरोग्य सेवा देण्याचा मानस आहे. तो बुरुडगाव रस्त्यावरील मनपाच्या या रुग्णालयाच्या माध्यमातून पूर्ण होईल.