क्रिकेटमध्ये रोज नवनवीन विक्रम तयार होतात, काही मोडले जातात, काही विसरले जातात… पण काही विक्रम असे असतात की ते दशकानुदशके लोकांच्या लक्षात राहतात. असाच एक विक्रम 1975 मध्ये न्यूझीलंडचा सलामीवीर ग्लेन टर्नरने केला होता. त्याने एकदिवसीय सामन्यात 201 चेंडू खेळत 171 धावा केल्या होत्या, आणि विशेष म्हणजे संपूर्ण 60 षटकं फलंदाजी केली होती. गेली 50 वर्षं झाली, पण कोणताही महान खेळाडू आजपर्यंत तो विक्रम मोडू शकलेला नाही.

ग्लेन टर्नरचा रेकॉर्ड
सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे आणि त्याचदरम्यान ग्लेन टर्नरच्या ऐतिहासिक विक्रमाची पुन्हा एकदा आठवण होत आहे. 1975 साली न्यूझीलंड आणि पूर्व आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या वर्ल्ड कप सामन्यात हा विक्रम घडला. त्या काळात एकदिवसीय सामने 60 षटकांचे असायचे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने फलंदाजी घेतली आणि ग्लेन टर्नर सलामीसाठी उतरला. त्याने 201 चेंडू खेळून नाबाद 171 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत 2 षटकार आणि 16 चौकारांचा समावेश होता.
टर्नरच्या या ऐतिहासिक खेळीमुळे न्यूझीलंडने 60 षटकांत 309 धावा केल्या आणि आफ्रिकेसमोर मोठे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ केवळ 128 धावा करू शकला आणि 8 गडी गमावले. न्यूझीलंडने हा सामना 181 धावांनी जिंकला आणि ग्लेन टर्नरला ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले.
आजपर्यंत मोडला नाही हा रेकॉर्ड
आजतागायत कोणताही खेळाडू एकदिवसीय सामन्यात 201 चेंडू खेळलेला नाही. आता सामने 50 षटकांचे झाले आहेत, त्यामुळे संपूर्ण सामन्यात फलंदाजी करणे जवळपास अशक्यच वाटते. तरीही हा विक्रम आजही अबाधित राहिला आहे आणि क्रिकेटप्रेमींसाठी तो एक ऐतिहासिक प्रेरणा ठरतो.
या विक्रमाच्या जवळ जाणाऱ्या काही खेळाडूंमध्ये कॅनडाचा आशिष बागई (2007 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध 172 चेंडूत 137 धावा) आणि इंग्लंडचा बिल अथी (1986 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 172 चेंडूत 142 धावा) यांचा उल्लेख करता येईल. पण टर्नरचा 201 चेंडूंचा एकदिवसीय विक्रम आजही सर्वांच्या वर आहे, क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला.