भारताने संरक्षणाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. देशाने एक असं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलं आहे, जे केवळ आपल्या सीमांच्या आत नव्हे, तर संपूर्ण आशियात, युरोपच्या काही भागांत आणि अगदी आफ्रिकेपर्यंत पोहोचू शकतं. या क्षेपणास्त्राचं नाव आहे अग्नि-5 आणि ते भारताच्या स्वावलंबी, सक्षम आणि जागतिक दर्जाच्या लष्करी तंत्रज्ञानाचं सर्वोत्तम उदाहरण आहे.

अग्नि-5 क्षेपणास्त्र
अग्नि-5 हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Intercontinental Ballistic Missile – ICBM) आहे, ज्याची रचना आणि निर्मिती भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) केली आहे. हे क्षेपणास्त्र घन इंधनावर चालतं आणि त्यामुळं ते गरज भासल्यावर झपाट्याने तैनात करता येतं. त्याची रेंज 5,000 ते 5,500 किलोमीटर इतकी सांगितली जाते, मात्र काही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की प्रत्यक्षात ही रेंज 7,000 ते 8,000 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकते.
ही क्षमता केवळ भारतापुरती मर्यादित नाही. अग्नि-5 मुळे बीजिंगसारखी चीनमधील प्रमुख शहरे, आशियातील बहुतेक देश, युरोपमधील काही भाग, आणि अगदी आफ्रिकेच्या काही प्रदेशांपर्यंत भारताचा प्रभावशाली अण्वस्त्र प्रतिबंध पोहोचू शकतो. यामुळं हे क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण धोरणात एक महत्त्वाचा टप्पा आहे, विशेषतः चीनसारख्या प्रतिस्पर्ध्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि दडपशाहीला उत्तर देण्यासाठी.
अग्नि-5 ची खासियत
अग्नि-5 क्षेपणास्त्र 1,500 किलोग्रॅमपर्यंतचा पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे, ज्यामध्ये पारंपरिक आणि अणु वॉरहेड्स दोन्हीचा समावेश होतो. त्यात MIRV (Multiple Independently targetable Reentry Vehicle) हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे, जे एका क्षेपणास्त्रामधून अनेक वेगवेगळी लक्ष्यं एकाच वेळी भेदू शकतं. बंकरमध्ये लपलेल्या शत्रूंनाही दहशत वाटेल असं सामर्थ्य या क्षेपणास्त्रात आहे.
मार्च 2024 मध्ये, ‘मिशन दिव्यस्त्र’ अंतर्गत अग्नि-5 ची यशस्वी चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये त्याने एकाचवेळी 3 ते 4 वेगवेगळ्या वॉरहेड्स वाहून नेण्याची क्षमता दाखवून दिली. या क्षेपणास्त्राची गती देखील थक्क करणारी आहे, सुमारे 29,400 किलोमीटर प्रतितास. ही गती त्याला जगातील सर्वात जलद बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी एक बनवते.
अग्नि-5 ची किंमत
हे क्षेपणास्त्र पूर्णतः स्वदेशी आहे. अग्नि-5 चा विकास 2007 मध्ये सुरू झाला होता आणि तो अग्नि-3 या क्षेपणास्त्राची अधिक प्रगत आवृत्ती आहे. आजपर्यंत, म्हणजे जून 2025 पर्यंत, अग्नि-5 ची 9 वेळा यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. एका क्षेपणास्त्राची अंदाजे किंमत 50 कोटी रुपये (सुमारे 7 मिलियन डॉलर्स) इतकी आहे.