शंभर वर्षांतही तुटणार नाही असा रेकॉर्ड! कोण आहे हा महान क्रिकेटपटू, ज्याच्या नावाची जगभर होतेय चर्चा?

Published on -

क्रिकेटच्या इतिहासात काही क्षण असे असतात जे केवळ आकडेवारीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते शतकानुशतके आठवले जातात. असेच एक अविश्वसनीय आणि आजही अबाधित असलेले पान लिहिले गेले होते 19 एप्रिल 2006 रोजी, जेव्हा एका वेगवान गोलंदाजाने फलंदाजी करताना असामान्य विक्रम केला आणि तोही नाईट वॉचमन म्हणून!

चितगावच्या कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी, याच दिवशी त्याचा वाढदिवसही होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मॅथ्यू हेडनची विकेट गमावल्यावर, सहसा पुढे फलंदाजीसाठी येणाऱ्या रिकी पॉन्टिंगऐवजी नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आले गिलेस्पीला. त्याचे काम फक्त 2-3 षटके खेळून दिवसाचा खेळ निभावून नेण्याचा होता. पण पुढे जे काही घडलं, ते इतिहासात अमर ठरलं.

जेसन गिलेस्पीचा रेकॉर्ड

गिलेस्पीने चितगावच्या त्या मैदानावर जे केले, ते खरं तर कुणालाही स्वप्नातही वाटलं नसतं. त्याने तब्बल 425 चेंडूंना सामोरे जात 201 नाबाद धावा केल्या. या खेळीत त्याने 26 चौकार आणि 2 षटकार ठोकले. एवढंच नव्हे, तर दुसऱ्या बाजूला मायकेल हसीनेही 182 धावांची भक्कम साथ दिली आणि दोघांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाचा डाव 581/4 पर्यंत नेला.

ही केवळ एक प्रभावशाली खेळी नव्हती, तर गिलेस्पीच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी होती, ज्यात त्याने नुसती फलंदाजीच नाही तर गोलंदाजीतही चमक दाखवली. पहिल्या डावात 3 बळी घेतले आणि नंतर फलंदाजीत हे दुहेरी शतक. ही कामगिरी म्हणजे क्रिकेटमधील एक परीकथा वाटावी अशीच होती.

‘असा’ रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू

सामना एक डाव आणि 80 धावांनी ऑस्ट्रेलियाने सहज जिंकला, पण या विजयाच्या बातम्यांपेक्षा जास्त चर्चा झाली ती गिलेस्पीच्या ऐतिहासिक फलंदाजीची. नाईट वॉचमन म्हणून कसोटी सामन्यात दुहेरी शतक करणारा तो आजवरचा एकमेव खेळाडू आहे. या विक्रमाला आज 19 वर्षे झाली आहेत.

क्रिकेटमध्ये अनेक विक्रम दरवर्षी तयार होतात, काही मोडले जातात, काही विसरलेही जातात. पण गिलेस्पीने जे करून दाखवलं, ते केवळ एक आकडा नव्हता. एका वेगवान गोलंदाजाने केलेली ही किमया आजही चर्चिली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News