मध्य प्रदेशाच्या काळ्या मातीच्या कुशीत, विंध्याचलच्या उंच टेकड्यांवर विसावलेलं एक जणू स्वप्नवत ठिकाण म्हणजे मांडू. डोंगराच्या कड्यावरून वाहणारा गार वारा, झाडांच्या सावलीत लपलेल्या प्राचीन इमारती, आणि इतिहासाचा साक्षीदार झालेलं प्रेमकथांचं गाव मांडूला एकदा तरी भेट दिल्याशिवाय भारताची ऐतिहासिक भटकंती अपूर्णच राहील.

एकेकाळी ‘शादियाबाद’ म्हणजेच ‘आनंदाचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडूला आजही त्या नावाशी साजेसं तेज आहे. सुलतानांच्या काळात ही भूमी केवळ व्यापाराने नाही, तर संस्कृतीने, प्रेमकथांनी आणि स्थापत्यकलेनेही समृद्ध होती. येथे तुम्हाला भेटतील अवशेष, भक्कम खडक, उंचच उंच टेकड्या आणि इतिहासाच्या पावलांनी झपाटलेले प्राचीन राजवाडे हे सगळं पाहताना वेळ कसा जातो ते कळतही नाही.
मांडू
मांडूला ‘अवशेषांचे गाव’ म्हणूनही ओळखतात. इथे एकदा फिरायला लागलं की, प्रत्येक वळणावर एक नवा इतिहास उलगडतो. बाज बहादूर आणि राणी रूपमतीची प्रेमगाथा इथे आजही हवेत तरंगते, त्यांच्या वास्तू आजही त्यांच्या भावना जपत उभ्या आहेत. रूपमतीचा राजवाडा त्या काळच्या सौंदर्य आणि प्रेमाच्या कल्पनांचा जिवंत नमुना आहे. तिथून दिसणारा नर्मदा नदीचा नजारा पाहताना आजही पर्यटक भारावून जातात.
या गावात सुमारे 12 प्रवेशद्वार आहेत, ज्यात दिल्ली गेट हे मुख्य प्रवेशद्वार आहे. हे 1405 ते 1407 च्या दरम्यान बांधले गेले होते आणि आजही त्याच ऐटीत पर्यटकांचे स्वागत करतं. मांडवगड म्हणूनही ओळखलं जाणारं मांडू सुमारे 2000 फूट उंचीवर वसलेलं असल्यामुळे इथून दिसणारा परिसर मन मोहवून टाकतो.
जहाज महाल आणि बरंच काही
मांडूमधल्या जहाज महालचं नाव ऐकताच डोळ्यांसमोर उभा राहतो एक तलावात तरंगणाऱ्या जहाजासारखा राजवाडा. तर हिंदोळा महाल म्हणजे झुल्यासारखा दिसणारा अनोखा अनुभव. जामा मस्जिद आणि अशरफी महाल ही ठिकाणंही इतिहासप्रेमींच्या यादीत नक्की असतात.
मांडूच्या सौंदर्याला धार्मिकता आणि अध्यात्मिकतेचा स्पर्श देतो नीलकंठ राजवाडा आणि त्यातील प्राचीन शिवमंदिर. इथे आल्यानंतर एक वेगळीच शांतता मनात भरून राहते. हे ठिकाण एकेकाळी अकबराच्या हिंदू पत्नीसाठी बांधण्यात आलं होतं. इथल्या भिंतींवर आपल्याला अकबराच्या कलेचे ठसे पाहायला मिळतात.
याशिवाय, हाथी महाल, दाई का महल, जाली महाल आणि दरिया खानची मजार ही ठिकाणंही तुम्हाला मांडूच्या प्रत्येक थराचा अनुभव देतील. आणि हो, इको पॉइंटला जाऊन एकदा जोरात ओरडा तुमचाच आवाज पुन्हा हवेतून परत तुमच्याकडे येईल, जणू इतिहासच तुमच्याशी संवाद साधतो आहे.