जर तुम्ही बजेटमध्ये एक टिकाऊ टॅबलेट शोधत असाल, तर OPPO ने तुमच्यासाठी एक भन्नाट पर्याय आणला आहे. OPPO Pad SE हा टॅबलेट आता भारतात लाँच झाला असून, 8 जुलैपासून त्याची विक्री सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या ऑफरमध्ये तुम्हाला हा टॅब फक्त ₹12,999 मध्ये मिळू शकणार आहे.

OPPO Pad SE ची वैशिष्ट्ये
OPPO Pad SE चं सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे त्याची जबरदस्त बॅटरी लाईफ. कंपनीचा दावा आहे की, हा टॅबलेट 800 दिवसांपर्यंत स्टँडबायवर टिकू शकतो. यामध्ये 9,340mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एकदा फुल चार्ज केल्यानंतर तुम्ही सलग 11 तासांपर्यंत ऑनलाइन फिल्म्स पाहू शकता किंवा 80 तास संगीत ऐकू शकता. आणि जर तुम्ही टॅब वापरत नसाल, तरीही त्याचा स्मार्ट पॉवर सेव्हिंग मोड उर्जा वाचवतो आणि 7 दिवसांनी आपोआप बंद होतो.
या टॅबमध्ये 11 इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे, त्यामुळे तुम्हाला स्क्रोल करताना किंवा व्हिडिओ पाहताना भन्नाट अनुभव मिळेल. 500 nits ब्राइटनेससह, तुम्ही बाहेरच्या उजेडातसुद्धा यावर सहज काम करू शकता.
प्रोसेसिंग आणि कॅमेरा
प्रोसेसिंगच्या बाबतीतही OPPO Pad SE कमकुवत नाही. यामध्ये MediaTek Helio G99 चिपसेट दिला आहे, जो Mali-G57 MC2 GPU सह कार्य करतो. 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज यामध्ये आहे. Android 15 आधारित ColorOS 15.0.1 वर चालणाऱ्या या टॅबमध्ये तुम्हाला सुलभ आणि नवीन अनुभव मिळतो. कॅमेरा सेगमेंटमध्ये 5MPचा फ्रंट आणि 5MPचा रिअर कॅमेरा असून, ते 1080p रिझोल्यूशनवर व्हिडिओ शूटिंगसाठी सक्षम आहेत.
किंमत किती?
किंमतीच्या दृष्टीने, OPPO Pad SE तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. बेसिक Wi-Fi मॉडेल (4GB RAM + 128GB) ₹13,999 मध्ये आहे, तर 6GB RAM असलेलं LTE मॉडेल ₹15,999 मध्ये आणि 8GB RAM + LTE व्हर्जन ₹16,999 मध्ये विक्रीस येणार आहे. परंतु पहिल्या सेलमध्ये ₹1,000 कूपन डिस्काउंटसह बेसिक मॉडेल तुम्हाला ₹12,999 मध्ये मिळणार आहे. याशिवाय, हे टॅबलेट Starlight Silver आणि Twilight Blue या दोन आकर्षक रंगांमध्ये येतो.
हे टॅबलेट 530 ग्रॅम वजनाचं असून, हातात धरायला हलकं आणि टिकाऊ आहे. यामध्ये 4G LTE (पर्यायी), Wi-Fi 802.11ac (2.4GHz + 5GHz), Bluetooth 5.4 यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. त्यासोबतच, क्वाड स्पीकर सेटअपमुळे व्हिडिओ पाहणं आणि म्युझिक ऐकणं आणखी रोमांचक होतं.