भारतीय रेल्वेच्या प्रवासात एक नवीन, क्रांतिकारी पान जोडलं जात आहे. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आता ट्रॅकवर येण्यासाठी सज्ज झाली आहे. केवळ रेल्वेच्या दृष्टीने नव्हे, तर पर्यावरणाच्या आणि भविष्यातील इंधन धोरणाच्या दृष्टीनेही ही एक मोठी झेप मानली जात आहे. बदलत्या तंत्रज्ञानासोबत रेल्वे जशी नव्यानं सजते आहे, तसंच देशाचं भविष्यही अधिक स्वच्छ आणि हरित होण्याच्या दिशेने वळतंय.

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन
भारतीय रेल्वे हे जगातल्या सर्वांत मोठ्या आणि व्यस्त नेटवर्कपैकी एक. रोज कोट्यवधी लोक रेल्वेच्या मदतीनं एक गाव सोडून दुसऱ्या शहरात पोहोचतात. इतक्या मोठ्या व्यवस्थेचं तंत्रज्ञान नित्य नवं ठेवणं ही एक मोठी जबाबदारी आहे, आणि याच दिशेनं रेल्वेने आता हायड्रोजन ट्रेनची चाचणी यशस्वीपणे पूर्ण करून एक अभूतपूर्व टप्पा गाठला आहे. ही चाचणी चेन्नईच्या ‘इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी’मध्ये पार पडली असून, यात नवीन कोच तयार करण्यात आलेले नाहीत, उलट डिझेलवर चालणाऱ्या DEMU कोचचं रूपांतर हायड्रोजनवर चालणाऱ्या प्रणालीत करण्यात आलं आहे.
या विशेष ट्रेनमध्ये ना डिझेल लागतो, ना वीज. त्याऐवजी हायड्रोजनचा वापर करून वीज तयार केली जाते आणि ती वीजच ट्रेन चालवण्यासाठी वापरली जाते. विशेष म्हणजे या ट्रेनमधून केवळ पाण्याची वाफ उत्सर्जित होते, कोणताही प्रदूषक वायू नाही. अशा पद्धतीने चालणारी ट्रेन पर्यावरणासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. धूर, कार्बन किंवा इतर विषारी उत्सर्जन न करता, ही ट्रेन आपली गती टिकवून ठेवते म्हणजेच खर्चही कमी आणि पर्यावरणही सुरक्षित.
हायड्रोजन फ्युएल सेल
हायड्रोजन फ्युएल सेल ही या प्रणालीची केंद्रबिंदू आहे. हायड्रोजन वायू आणि हवेत असलेला ऑक्सिजन एकमेकांशी रासायनिक प्रतिक्रिया करून वीज निर्माण करतात. ही वीज मग ट्रेनच्या मोटर्सना पुरवली जाते. शिवाय, ट्रेनमध्ये बॅटरीही बसवण्यात आली आहे, जी अधिक मागणीच्या वेळी सपोर्ट देते आणि फ्युएल सेलच्याच सहाय्याने चार्ज होते. ही संपूर्ण प्रणाली एकमेकांच्या पूरक असून, ती अत्यंत कार्यक्षम पद्धतीने ट्रेन चालवते.
जगात हायड्रोजन ट्रेन चालवणाऱ्या देशांमध्ये जर्मनी आणि फ्रान्सचा समावेश आधीच झाला आहे. आता भारतही या यादीत सामील झाला असून, ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात या ट्रेन वेगवेगळ्या शहरांमध्ये धावू लागतील, आणि आपल्या दैनंदिन प्रवासाचं चित्रच बदलून टाकतील.
ट्रेनची गती
या ट्रेनच्या गतीविषयी बोलायचं झालं, तर अहवालांनुसार ती ताशी 110 किलोमीटर वेगाने धावू शकते. म्हणजे गतीमध्ये कोणताही तडजोड नाही, उलट खर्च आणि प्रदूषण कमी करत एक अत्याधुनिक पर्याय म्हणून ती पुढे येते आहे.