क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही विराट कोहली थांबलेला नाही तो आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे, पण ही इनिंग मैदानावर नव्हे, तर व्यवसायाच्या खेळात आहे. मैदानावर आपले बॅटिंग कौशल्य दाखवून करोडो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या कोहलीने आता उद्योगविश्वात मोठा डाव खेळायला सुरुवात केली आहे. आणि त्याची ही सुरुवातच इतकी भव्य आहे की तिच्यावर सगळ्यांचे लक्ष गेले आहे.

अॅजिलिटास कंपनी
टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीच्या आयुष्यात जरा मोकळा वेळ आला आणि त्याने याच वेळेचा योग्य उपयोग करत व्यवसाय क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करायला सुरुवात केली. यासाठी त्याने निवड केली एका नव्या स्पोर्ट्सवेअर कंपनीची अॅजिलिटास. ही कंपनी काहीशी नवखीसारखी वाटत असली तरी तिच्यामागे एक अनुभवी चेहरा अभिषेक गांगुली आहे, जे पूर्वी पुमा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक होते आणि यांनीच कोहलीला पुमाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सादर केलं होतं.
कोहलीने या नव्या ब्रँडमध्ये तब्बल ₹40 कोटींची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे ही गुंतवणूक करताना त्याने पुमासोबतचा 110 कोटींचा चालू करार संपवला. पुमा त्याच्या कराराची किंमत वाढवून 300 कोटीपर्यंत न्यायच्या तयारीत होती, पण कोहलीने त्याचा मार्ग वेगळा निवडला. आता तो अॅजिलिटासमध्ये केवळ गुंतवणूकदारच नव्हे, तर ब्रँडचा सक्रिय भागीदार आणि प्रचारक देखील असेल.
अॅजिलिटास कंपनीचे उद्दिष्ट
अॅजिलिटासचं मुख्य उद्दिष्ट आहे भारतात ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत एक संपूर्ण स्पोर्ट्स इकोसिस्टम तयार करणं. उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळ्या टप्प्यांवर भारतीय क्रीडा क्षेत्राला बळ देणं. कंपनीला जर एखादी गोष्ट स्वतः तयार करता आली नाही, तर ती त्यासाठी दुसऱ्या कंपन्यांचं अधिग्रहण करणार आहे. याच पद्धतीनं 2023 मध्ये त्यांनी मोचिको शूज नावाची कंपनी विकत घेतली, जी अनेक जागतिक ब्रँडसाठी बूट तयार करते.
विराट कोहलीची ही फक्त सुरुवात आहे. सध्या त्याला कंपनीने 3.6 लाख क्लास 2 CCP शेअर्स दिले आहेत, जे भविष्यात इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित होतील. याचा अर्थ असा की विराट अॅजिलिटासमध्ये आपली भागीदारी अधिक मजबूत करणार आहे. आधीच वन8, रॉग्न, चिसेल फिटनेस आणि एफसी गोवा यांसारख्या ब्रँड्समध्ये त्याची भागीदारी आहे. आता अॅजिलिटाससोबतही तो भागीदारी करत आहे.