जसप्रीत बुमराह..भारताचा तो धडाकेबाज वेगवान गोलंदाज, ज्याच्या हातात चेंडू आला की विरोधी संघाच्या मनात धडकी भरते. पण सध्या क्रिकेटच्या दुनियेत एक चर्चा वेगाने पसरत आहे. बुमराह कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार का? इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यानंतर अशी शक्यता व्यक्त होत आहे की बुमराह लवकरच टेस्टमधून कायमचा निरोप घेईल. ही फक्त अफवा नाही, तर भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याच्या सूचक विधानामुळे या चर्चेला उधाण आलं आहे.

मोहम्मद कैफच्या पोस्टने चाहत्यांची वाढली चिंता
चौथ्या कसोटीत बुमराहने 28 षटकं टाकून केवळ एक बळी घेतला आणि 95 धावा दिल्या. त्याचा वेगही नेहमीसारखा आक्रमक न वाटता 125-130 किमी प्रतितास इतकाच राहिला. ही आकडेवारी बघता अनेकांच्या भुवया उंचावल्या. मोहम्मद कैफने आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असे म्हटले की, बुमराह आता त्याच्या शरीराशी संघर्ष करत आहे. तो एक जबाबदार आणि प्रामाणिक खेळाडू आहे. जर त्याला वाटत असेल की तो शंभर टक्के देऊ शकत नाही, तर तो स्वतःहून मागे सरकण्याचा निर्णय घेईल.
बुमराच्या निवृत्तीविषयीच्या या चर्चांनी चाहते चिंतेत पडले आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांसारख्या दिग्गजांच्या निवृत्तीमुळे भारतीय संघाची ओळख बदलत चालली आहे. अशात बुमराहसारखा ‘गेमचेंजर’ खेळाडूही जर मागे हटत असेल, तर चाहत्यांना नक्कीच धक्का बसण्यासारखे आहे.
बुमराहची कारकीर्द
बुमराहच्या कारकीर्दीकडे पाहिलं, तर त्याचं योगदान अभूतपूर्व आहे. वयाच्या 31 व्या वर्षी त्याने भारतासाठी 48 कसोटी सामन्यांत 218 बळी घेतले आहेत. 89 एकदिवसीय सामन्यांत त्याने 149 विकेट्स आणि 89 टी-20 सामन्यांतही 89 बळी टिपले आहेत.
आजच्या घडीला क्रिकेट हे केवळ तंत्राचं नव्हे, तर शरीराच्या क्षमतेचंही मोठं कसब झालं आहे. सातत्याने दुखापतींनी त्रस्त असलेल्या बुमराहने अनेकदा पुनरागमन केलं आहे. पण, अशात मोहम्मद कैफच्या पोस्टने एक वेगळीच चर्चा सुरू केली आहे. आता संपूर्ण देशाची नजर आहे पुढील कसोटीवर आणि त्यानंतर बुमराहच्या निर्णयावर.