जगातील शक्तीशाली देशांची चर्चा झाली, की अमेरिका, चीन, रशिया यांची नावं अगदी सहजपणे डोळ्यासमोर येतात. आणि 2025 सालची नव्याने सादर झालेली यादी हीच अधोरेखित करते, जागतिक ताकदीचा निर्णय केवळ लष्करी ताकदीनं नाही, तर अर्थव्यवस्था, लोकसंख्या आणि दरडोई उत्पन्न या घटकांच्या संमिश्र प्रभावानं ठरतो. या यादीत भारताचं स्थान काय, आणि जगातील इतर टॉप देशांची स्थिती कशी आहे, हे समजून घेतलं की समकालीन जागतिक समीकरणांचा अंदाज येतो.
अमेरिका टॉपवर

या अहवालात अमेरिकेनं पुन्हा एकदा जगात अव्वल स्थान मिळवलं आहे. $27.4 ट्रिलियन इतक्या प्रचंड GDP आणि 33.5 कोटी लोकसंख्येसह, ती केवळ आर्थिकच नव्हे, तर धोरणात्मक, तांत्रिक आणि लष्करी बाबतीतही सर्वाधिक प्रभावशाली देश ठरते. दरडोई GDP जवळपास $81,695 असल्यामुळे अमेरिकेतील सरासरी नागरिकांचं आर्थिक स्थान जगात सर्वोच्च गटात आहे.
चीन
चीन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचा GDP $17.8 ट्रिलियन आहे. मात्र, त्याची लोकसंख्या 1.4 अब्ज पेक्षा जास्त असल्यामुळे दरडोई GDP $24,558 इतकी आहे. तरीही, उत्पादनक्षमता, जागतिक व्यापारातील दबदबा आणि तांत्रिक गुंतवणुकीमुळे चीनची भूमिका फार मोठी आहे.
रशिया
रशियाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा तुलनेनं लहान GDP $2.02 ट्रिलियन असूनही, अणुशक्ती, ऊर्जा स्रोतांवरील नियंत्रण आणि लष्करी रणनीतीमुळे तो या यादीत उंचावतो. 140 दशलक्ष लोकसंख्येसह त्याचा दरडोई GDP $44,104 इतका आहे, जो विकसित राष्ट्रांच्या पातळीवर पोहोचतो.
टॉप 10 मधील इतर देश
युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया हे सर्व देश विविध औद्योगिक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक प्रभावामुळे या टॉप 10 यादीत ठामपणे आपली उपस्थिती दर्शवतात. युरोपातील हे देश तुलनेनं लहान लोकसंख्या असूनही उच्च GDP आणि आंतरराष्ट्रीय धोरणांतील सक्रिय सहभागामुळे प्रभावशाली ठरतात.
यादीतील विशेष उल्लेख म्हणजे सौदी अरेबिया आणि इस्रायल. सौदी अरेबिया $1.07 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेसह जागतिक तेल बाजारावर वर्चस्व ठेवतो. तर इस्रायल फक्त 9.7 दशलक्ष लोकसंख्या आणि $510 अब्ज GDP असूनही सायबर सुरक्षा आणि संरक्षण तंत्रज्ञानातील अग्रेसरतेमुळे या स्थानावर आहे.
भारत टॉप 10 मध्ये नाही
ही यादी पाहताना जाणवतं की भारत अजूनही या टॉप 10 मध्ये समाविष्ट नाही. पण यामागचं कारण GDP आणि लोकसंख्येतील तफावत आहे. भारताची एकूण अर्थव्यवस्था मोठी असली (2025 मध्ये अंदाजे $4 ट्रिलियनच्या आसपास), तरी 1.44 अब्ज लोकसंख्येमुळे दरडोई GDP तुलनेनं कमी राहतो. त्यामुळे देशाची एकंदर सामर्थ्य बळकट असली, तरी जागतिक प्रभावाच्या मोजमापात अजून पायरी चढावी लागते.
भारत सध्या या यादीत टॉप 10 च्या बाहेर असला तरी, येत्या काही वर्षांत भारताच्या जागतिक स्थानात झपाट्यानं बदल होण्याची शक्यता आहे. डिजिटल क्रांती, स्टार्टअप यश, संरक्षणात स्वावलंबन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक यामुळे भारताच्या सामर्थ्याचा आलेख चढता आहे.