शत्रूंच्या छातीत धडकी भरवणारं भारतीय शस्त्र!काही मिनिटांत टँक-बंकर उडवणाऱ्या स्वदेशी मिसाईलची यशस्वी चाचणी, पाहा वैशिष्ट्ये

Published on -

जेव्हा युद्धभूमीवर टँक आणि बंकरसारख्या अवजड संरचनांवर अचूक आणि जलद हल्ला करणे आवश्यक असते, तेव्हा तंत्रज्ञानाचीच खरी परीक्षा होते. भारताने नुकतीच अशी एक चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, जी केवळ देशाच्या संरक्षण यंत्रणेसाठी नाही, तर जागतिक स्तरावरही भारताच्या वाढत्या सामर्थ्याचं द्योतक बनली आहे. डीआरडीओच्या प्रयत्नांमुळे भारताने आणखी एक अत्याधुनिक शस्त्र विकसित केलं आहे. ULPGM-V3 हे नाव जरी ऐकलं, तरी त्यामागची ताकद थेट शत्रूच्या छावणीत तणाव निर्माण करणारी ठरली आहे.

ULPGM-V3 ची यशस्वी चाचणी

आंध्र प्रदेशातील कुर्नूलमध्ये असलेल्या ‘नॅशनल ओपन एरिया रेंज’मध्ये नुकतीच ULPGM-V3 या ड्रोन-प्रक्षेपित क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी पार पडली. हे क्षेपणास्त्र फक्त 12.5 किलो वजनाचं असलं, तरी त्याची ताकद आणि परिणामक्षमता अफाट आहे. लहान ड्रोनद्वारेही सहज प्रक्षेपित होणारं हे शस्त्र केवळ हलकं नाही, तर अत्यंत प्राणघातकही आहे. विशेष म्हणजे, याची रचना अशी आहे की, कोणत्याही बंकर किंवा टँकला अचूकपणे लक्ष्य करून क्षणार्धात नष्ट करू शकते.

हे क्षेपणास्त्र आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून, इमेजिंग इन्फ्रारेडवर आधारित ‘पॅसिव्ह होमिंग सीकर’चा वापर यात करण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीचा अंधार असो किंवा दिवसा धूळधपाटीने भरलेलं युद्धक्षेत्र ULPGM-V3 आपलं लक्ष्य अचूक ओळखतं आणि ‘फायर अँड फोर्गेट’ म्हणजेच एकदा सोडलं की परत पाहण्याची गरजच नाही, अशा मोडमध्ये कार्यरत राहतं. त्यात ‘द्वि-मार्गी डेटा लिंक’ सिस्टिम असल्याने, क्षेपणास्त्र हवेत असतानाही त्याचं लक्ष्य बदलता येतं, जे युद्धसमानात निर्णायक ठरू शकतं.

ULPGM-V3 ची वैशिष्ट्ये

DRDO आणि टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीने मिळून विकसित केलेलं हे शस्त्र 4 किलोमीटरपर्यंत दिवसा आणि 2.5 किलोमीटरपर्यंत रात्री अचूक हल्ला करू शकतं. त्यामध्ये असलेली ड्युअल-थ्रस्ट सॉलिड प्रोपल्शन सिस्टम हे लवचिकतेचं आणि वेगाचं आणखी एक उदाहरण आहे. शत्रूच्या संरक्षित किल्ल्यांवर, बंकरांवर किंवा टँकसारख्या लोखंडी रचनेवर हे क्षेपणास्त्र जेव्हा आदळतं, तेव्हा त्याचा प्रभाव काही सेकंदातच दिसून येतो.

या संपूर्ण प्रकल्पाची विशेष बाब म्हणजे हे शस्त्र संपूर्णतः भारतात तयार झालं आहे. बीडीएल, अदानी डिफेन्स, विविध एमएसएमई आणि स्टार्टअप्सने मिळून हे उत्पादन उभं केलं आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमांना नवसंजीवनी मिळालेली आहे. केवळ आयातवर अवलंबून न राहता, भारत आता स्वतःचं संरक्षण कवच घडवत आहे, तेही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने.

राजनाथ सिंह यांची महत्वाची माहिती

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचणीची घोषणा करताना याला भारताच्या संरक्षण क्षेत्रातील एक मोठा टप्पा म्हटलं. त्यांच्या मते, DRDO ने केवळ एक क्षेपणास्त्र बनवलं नाही, तर भारताच्या लष्करी विश्वासार्हतेला एक नवी धार दिली आहे. आज या क्षेपणास्त्राच्या यशाने भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, युद्धाच्या मैदानात यश फक्त शौर्यानेच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या बळावरही मिळवता येतं आणि भारत आता त्या मार्गावर ठामपणे चालू लागला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!