आपण लहानपणापासूनच शाळेत भाजी आणि फळं यांचं वेगळं वर्गीकरण शिकतो. परंतु आज आपण ज्या भाज्या वर्षानुवर्षे भाजी म्हणून खाल्ल्या आहेत, त्या प्रत्यक्षात वनस्पतीशास्त्रीय दृष्टिकोनातून फळं आहेत हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल. टोमॅटो, वांगी, भोपळा, वाटाणे, बीन्स, सिमला मिरची किंवा अगदी कारल्यासारख्या भाज्या या सगळ्यांचं वैज्ञानिक वर्गीकरण फळांमध्ये होतं.
फळ म्हणजे जे पानं किंवा देठ नसून फुलांपासून बनतं आणि ज्यात बिया असतात. याच निकषावर ह्या सर्व ‘भाज्या’ खरं तर फळं ठरतात. चला तर मग पाहूया अशाच काही भाज्या ज्या खऱ्या अर्थाने फळं आहेत.

वाटाणे
वाटाणे ही अशी एक चविष्ट भाजी आहे जी थंडीत प्रत्येकाच्या घरी हमखास दिसते. परंतु वाटाण्याची शेंग ही फुलांपासून तयार होते आणि तिच्यात बिया असतात. म्हणूनच ती भाजी नसून फळ ठरते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
बीन्स
बीन्ससुद्धा त्याच प्रकारात मोडतात. हिरव्या बीन्समध्ये असलेल्या बिया आणि त्यांचा फुलांपासून होणारा विकास यामुळे त्या फळ ठरतात. विशेषतः मधुमेहींसाठी बीन्स खूपच उपयुक्त असतात कारण त्या प्रथिनांनी भरलेले असतात.
सिमला मिरची
सिमला मिरची किंवा कॅप्सिकमचा समावेश सुद्धा फळांमध्ये होतो. सिमला मिरची फुलांपासून तयार होते आणि त्यात बिया असतात. विशेष बाब म्हणजे, सिमला मिरचीमध्ये कॅप्सेसिन नसते, जे तिखटपणाला कारणीभूत ठरतं.
कारले
कारल्याची चव जरी कडवट असली तरी त्याचा उपयोग औषधीय गुणांसाठी होतो. फुलांपासून तयार होणाऱ्या आणि बिया असलेल्या या कारल्याला सुद्धा वनस्पतीशास्त्र फळ मानतं. यामध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं.
भोपळा
भोपळाही असाच एक प्रकार आहे. मोठा आकार, आतमध्ये भरपूर बिया आणि गोडसर चव हे सर्व गुण भोपळ्याला फळ म्हणून ओळख देतात. भाजीच्या स्वरूपात वापरले जाणारे हे फळ चवीलाही खास असतं.
टोमॅटो
टोमॅटो तर यामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे. त्याचा लालसर रंग आणि रसाळ पोत पाहता अनेकांना वाटतं तो भाजीसारखा आहे, परंतु तो फुलांपासून तयार होतो आणि त्यात बिया असतात, म्हणून तो शास्त्रानुसार फळ आहे.
वांगी
वांगी सुद्धा अशीच एक भाजी आहे जिचा आपण ‘भाजी’ म्हणून उपयोग करतो, पण ती फुलांपासून बनते आणि त्यात बिया असतात. म्हणून ती ही फळ ठरते. यामध्ये भरपूर पोषणमूल्य असतं. विशेषतः जीवनसत्त्व A, K आणि पॉलीफेनॉल्स.