तोंडात आलेले अल्सर म्हणजे छोटंसं दुखणं वाटतं, पण यामुळे खायला-प्यायला त्रास, बोलताना वेदना, आणि सतत जळजळ यामुळे त्रस्त व्हायला होतं. कित्येकदा तर चविष्ट जेवण समोर असूनही आपण खाणं टाळतो, कारण तोंडात उठलेली फोड टोचायला लागते. अशा वेळी कोणताही घरगुती उपाय कामाला आला, तर तो वरदानासारखा वाटतो. असाच एक सोपा पण परिणामकारक उपाय आहे, तो म्हणजे जांभळाचे पान.

तोंडाच्या अल्सरची समस्या ही अनेकांना सतत त्रास देणारी गोष्ट आहे. ती दिसायला क्षुल्लक वाटते, पण रोजच्या आयुष्यात अनेक गोष्टींचं सुख हिरावून नेते. गरम किंवा थोडंसं चटपटीत काही खाल्लं की वेदना असह्य होतात. त्यामुळे लोक या त्रासावर अनेक गोष्टी करून पाहतात. काही जण बाजारातील औषधं वापरतात, काही लोक खाण्यापिण्यात बदल करतात. पण सर्व उपायांचा फारसा उपयोग होत नाही, म्हणून अशावेळी एखादा घरगुती, नैसर्गिक आणि विश्वासार्ह उपाय मिळणं महत्त्वाचं ठरतं.
जांभळाचे पान
पतंजली योगपीठाचे आचार्य बालकृष्ण यांनी यावर एक पारंपरिक उपाय सांगितला आहे, तो म्हणजे जांभळाचे पान. त्यांच्यामते या पानामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे अल्सर निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यास मदत करतात. इतकंच नाही तर हे पान तोंडाच्या आतील सूजही कमी करतं, आणि त्यामुळे खाणं-पिणं पुन्हा सुखकर वाटायला लागतं.
वापर कसा कराल?
उपायसुद्धा अगदी सोपा आहे. फक्त 8 ते 10 जांभळाची ताजी, हिरवी पाने घ्या. ती स्वच्छ धुवा आणि एका पातेल्यात उकळत्या पाण्यात टाका. सुमारे 5 ते 10 मिनिटं ती पाने उकळा. नंतर पाणी थोडं गार झालं की गाळून घ्या आणि या पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या करा.
फार तर 2-3 दिवसातच तुम्हाला फरक जाणवू लागेल आणि अल्सरच्या वेदनांतून आराम मिळेल. या घरगुती उपायामध्ये औषधांचा गुंता नाही, ना कोणतेही साईड इफेक्ट्स. फक्त एक साधं पान आणि थोडा संयम एवढंच हवं असतं.