पिवळसर दातांमुळे अनेकदा मोकळं हसता येत नाही, पिवळ्या दातांमुळे बऱ्याचदा लोक अपमान देखील करतात. या समस्यावर एक घरगुती उपाय म्हणजे कोळसा. कधी काळी जेवण शिजवायला वापरला जाणारा कोळसा तुम्हाला दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करू शकतो.

दात पिवळसर दिसण्यामागे अनेक कारणं असतात. चहा-कॉफीचं अति सेवन, धूम्रपान, अयोग्य स्वच्छता किंवा शरीरातील काही पोषणतत्त्वांची कमतरता. अशा वेळी बाजारातील महागडे टूथपेस्ट वापरूनही अनेकदा फरक पडत नाही. पण काळ्या कोळशात असा एक नैसर्गिक गुण आहे जो दातांवरील पिवळसर थर आणि जमा झालेला प्लेक सहजपणे दूर करतो तेही केमिकल्सशिवाय आणि साइड इफेक्ट्सशिवाय.
चारकोल आणि नारळ तेल
कोळसा म्हणजे चारकोल, पण तो कोळसा आपण ज्याने त्याने वापरायचा नसतो. अॅक्टिवेटेड चारकोल हा विशेष प्रकारचा कोळसा आहे, जो शुद्ध व नैसर्गिक झाडांपासून तयार होतो. तो फक्त पिवळसर थरच दूर करत नाही, तर दातांवर साचलेली घाण, विषारी घटक आणि बॅक्टेरिया यांना देखील कमी करतो. त्यात नारळाचं तेल मिसळल्यावर हा उपाय आणखी परिणामकारक ठरतो. कारण नारळाच्या तेलात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तोंडातली दुर्गंधी दूर करतात.
वापरायची पद्धत
वापरण्याची पद्धत खूपच सोपी आहे. एका लहान भांड्यात अर्धा चमचा अॅक्टिवेटेड कोळसा घ्या. त्यात दीड चमचा खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण ब्रशवर घ्या आणि सौम्यपणे 2-3 मिनिटे दातांवर फिरवा. सुरुवातीला कदाचित थोडं वेगळं वाटेल, पण काही दिवसांत तुम्हाला फरक स्पष्ट जाणवेल. याचा उपयोग आठवड्यातून 3 ते 4 वेळा करा, विशेषतः रात्री झोपण्याआधी.
मात्र हे लक्षात राहुद्या, हा उपाय नैसर्गिक असला तरीही अति वापर टाळावा. जर तुम्हाला तोंडात कोणतीही अॅलर्जी, जखम, किंवा खास दातांची समस्या असेल, तर एकदा दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाही विसरू नका.