प्रवास करताना आपण काळजी घेतो हेल्मेटची, सीट बेल्टची, ड्रायविंगच्या नियमांची… पण मानसिक आणि आध्यात्मिक सुरक्षिततेसाठी काय करता? अपघातांपासून शारीरिक सुरक्षा जितकी महत्त्वाची, तितकीच महत्त्वाची आहे मानसिक कवच. शास्त्रांनुसार सांगितले गेले आहे की, देवाची प्रार्थना आणि विशिष्ट मंत्रांचा जप केल्याने आपण अनिष्टापासून वाचू शकतो. विशेषतः वाहन चालवताना किंवा दूरच्या प्रवासाला निघताना काही मंत्रांचा जप केल्यास तो प्रवास सुखरूप होतो, असा लोकांचा विश्वास आहे.
आजच्या धकाधकीच्या युगात अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेकदा आपण सारे नियम पाळूनही अनपेक्षित प्रसंग ओढवतात. त्यामुळेच प्रवासाला निघताना शारीरिक सुरक्षेसोबतच मानसिक सुरक्षा आवश्यक आहे. शास्त्रांनुसार, काही विशिष्ट मंत्र असे आहेत जे गाडी सुरू करण्यापूर्वी म्हणल्यास ते प्रवासात येणाऱ्या संकटांपासून तुमचं आणि तुमच्या परिवाराचं रक्षण करतात.

‘ॐ अंते रक्षाय नमः’
हा मंत्र चालकांसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. हा जप मनाला स्थिरता देतो आणि संकटांच्या वेळेस मानसिक बळ प्रदान करतो. गाडी सुरू करण्यापूर्वी 3 ते 5 वेळा या मंत्राचा जप केल्याने अनिष्ट शक्तींपासून संरक्षण मिळते, असा विश्वास आहे.
‘ॐ ह्रं हनुमते नमः’
हनुमानजींच्या या मंत्राचा उच्चार केल्याने अडथळे दूर होतात आणि मार्ग मोकळा होतो. प्रवासादरम्यान अचानक निर्माण होणाऱ्या अडचणी टळतात, असे मानले जाते.
‘ॐ नमः शिवाय’
घरातून निघताना किंवा वाहन चालवण्यापूर्वी या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यूपासून रक्षण होते, असे धर्मशास्त्रांमध्ये नमूद केले आहे. हा मंत्र मन शांत ठेवतो, जे वाहन चालवताना फार आवश्यक आहे.
‘ॐ गं गणपतये नमः’:
प्रत्येक कामाच्या सुरुवातीला गणपतीला वंदन करणे हे शुभ मानले जाते. वाहन चालवण्यापूर्वी या मंत्राचा जप केल्यास विघ्नांचा नाश होतो आणि प्रवास निर्विघ्न होतो.
गाडीच्या डॅशबोर्डवर किंवा मोटारसायकलवर आपल्या श्रद्धेनुसार एखाद्या देवतेचं चित्र ठेवणं आणि वाहन सुरू करण्यापूर्वी त्या देवतेच्या नावाचा उच्चार करणं, ही एक छोटीशी पण प्रभावी सवय ठरू शकते.