या डिजिटल युगात, सोयीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञानात फसवणुकीचं एक नवीन रूप उगम पावतंय. अलीकडे अनेक लोकांच्या ईमेल इनबॉक्समध्ये एक असा मेल आला आहे, जो वरून पाहता अगदी सरकारी वाटतो, पण प्रत्यक्षात तो तुमचं बँक खातं रिकामं करण्यासाठी बनवलेला एक शिताफीने आखलेला सायबर घोटाळा आहे.

“नवीन PAN 2.0” घोटाळा
या मेलमध्ये लिहिलेलं असतं की तुमचं “नवीन PAN 2.0” तयार झालं असून ते डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. मेलमध्ये सरकारी लोगो, व्यावसायिक भाषा, आणि अधिकृत वाटणारी रचना वापरलेली असल्याने कोणालाही तो खरा वाटावा. पण जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता, तेव्हा तुम्ही नकळत फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकता.
या बनावट वेबसाइटवर तुम्हाला तुमचं नाव, आधार क्रमांक, पॅन नंबर, बँक तपशील असे अनेक संवेदनशील माहिती भरायला लावली जाते. आणि एकदा का ही माहिती त्यांच्या हातात गेली, की ते तुमचं बँक खातं रिकामं करणं हे केवळ काही मिनिटांचं काम राहतं. अशा फसवणुकीचा फटका बसल्यानंतर लोकांना अनेक महिने त्रास सहन करावा लागतो. पैशांची हानी, ओळखीचा गैरवापर आणि तणाव वेगळाच.
आयकर विभाग आणि PIB कडून अलर्ट
या पार्श्वभूमीवर, आयकर विभाग आणि PIB ने स्पष्टपणे सांगितलं आहे की “PAN 2.0” नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही. सरकारने कोणतंही नवीन पॅन कार्ड सध्या जारी केलेलं नाही, आणि अशा कोणत्याही मेलवर विश्वास ठेवू नये.
जर एखाद्या मेलमध्ये सरकारी सेवा देण्याचा दावा असेल, पण त्या वेबसाइटचा पत्ता ‘.gov.in’ ने संपत नसेल, तर तिथेच शंका घ्यायला हवी. तसेच, कोणतीही अनोळखी लिंक किंवा अटॅचमेंट ओपन करण्यापूर्वी ती नीट तपासली पाहिजे. तुमच्या मेलमध्ये आला असेल तर स्क्रीनशॉट घ्या, स्पॅम किंवा फिशिंग म्हणून रिपोर्ट करा आणि आपल्या जवळच्या लोकांनाही याबद्दल सतर्क करा.
तुम्ही चुकून त्या लिंकवर क्लिक करून माहिती भरली असेल, तर आधी बँकेशी तातडीने संपर्क करा. खाते तात्पुरते गोठवण्याची विनंती करा आणि सगळे पासवर्ड, UPI पिन, नेटबँकिंग लॉगिन तपशील लगेच बदला. यासोबतच, www.cybercrime.gov.in या सरकारी पोर्टलवर जाऊन ऑनलाइन तक्रार नोंदवता येते किंवा जवळच्या सायबर सेलमध्ये भेट देऊन अधिकृत तक्रार करता येते.