पावसाळा आला की हवेत गारवा पसरतो. निसर्गाचे सौंदर्य या काळात खुलून येते. मात्र, याच दिवसात एक समस्या सगळीकडे दिसून येते. ती म्हणजे, सापांचा त्रास.कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी काही वेळा साप घरी घुसतात आणि मग घरात एकच खळबळ माजते. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत ही समस्या अनेकांच्या घरी उगाचच डोकं वर काढते. कारण सापांना ओलसर, थंड आणि अंधारट जागा आवडतात आणि ही सगळी ठिकाणं आपल्याच घरात त्यांना सहज मिळतात.

अनेकदा साप आपल्या नकळत घरातल्या त्या कोपऱ्यात लपतात जिथे आपण कधी स्वच्छतेचा विचारही करत नाही. विशेषतः पलंगाखालची जागा, जुने फर्निचर, स्टोअर रूम किंवा वापरात नसलेले टब आणि बादल्या ही त्यांच्या लपण्याची आवडती ठिकाणं असतात. तुम्ही विचारही करणार नाही, पण अशा टबमध्ये किंवा बाल्कनीतल्या गमल्यांच्या मागे देखील साप विसावला असेल. त्यामुळे अशा ठिकाणी नेहमी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे.
‘ही’ ठिकाणं नेहमी स्वच्छ ठेवा
खरं सांगायचं तर साप कुठून आणि कसा येईल, हे सांगणं अवघडच. पण आपण काही ठोस उपाययोजना करून हे धोके कमी करू शकतो. घरात अंधार असलेल्या कोपऱ्यांमध्ये वेळोवेळी झाडून घ्या.
स्टोअर रूममधील वस्तू हलवा आणि शक्यतो काही दिवसांनी प्रकाश टाका. बेडखालची जागा साफ करत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराभोवती असलेल्या झाडाझुडपांवर सतत लक्ष ठेवा. कारण हीच ती जागा असते जिथून साप घरात प्रवेश करतात.
टब किंवा बादल्या उघड्या उघड्या ठेवू नका
पावसाच्या दिवसांत टब किंवा बादल्या उघड्या ठेवणं टाळा. त्या नेहमी झाकून ठेवा किंवा वापरात नसतील तर बाजूला ठेवून स्वच्छ करा. काहीजण या दिवसांत दरवाजाजवळ आणि घराच्या कोपऱ्यांवर फिनाईलची फवारणी करतात, ती सुद्धा एक चांगली उपाययोजना आहे. कारण फिनाईलचा वास अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांना दूर ठेवतो.
या सगळ्यात पालकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. मुलं घरातल्या बागेत किंवा कोपऱ्यात खेळायला जातात तेव्हा त्यांना थोडी जास्त सतर्कता शिकवावी लागेल. कारण एका क्षणाचं दुर्लक्षही मोठा धोका निर्माण करू शकतो.