भारतातील हवाई प्रवासाचा चेहरामोहरा दिवसेंदिवस बदलत चालला आहे. छोटे शहरंही विमानसेवेत जोडली जात आहेत. पण या सगळ्यात एक असे विमानतळ आहे जे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियात आपल्या भव्यतेसाठी ओळखले जाते. हे विमानतळ इतके मोठे आहे की त्यात संपूर्ण एक गाव वसवता येईल. ज्या पद्धतीने येथे सौरऊर्जेपासून वीज निर्माण होते आणि पावसाचे पाणी साठवले जाते, ते पाहून कोणालाही अभिमान वाटेल की आपण अशा देशात राहतो, जिथे पर्यावरणपूरक विमानतळ साकारले गेले आहे.

हैदराबादचा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
भारताच्या दक्षिणेकडील महत्त्वाच्या शहरांपैकी एक म्हणजे हैदराबाद. याच शहरात 2008 मध्ये सुरू करण्यात आलेले राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (HYD) सध्या भारतातील सर्वात मोठे विमानतळ मानले जाते. याचे क्षेत्रफळ तब्बल 5,500 एकर आहे. याआधी येथे बेगमपेट विमानतळ कार्यरत होते, परंतु वाढत्या वाहतुकीच्या गरजांमुळे नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात आले.
राजीव गांधी विमानतळ हे भारतातील पहिले विमानतळ आहे, जिथे सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. इथे फार्मा उद्योगासाठी स्वतंत्र ‘फार्मा झोन’ देखील तयार करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय औषध निर्यातीसाठी ही सुविधा खूप महत्त्वाची ठरते. आज हे विमानतळ सौरऊर्जेपासून सुमारे 25 मेगावॅट वीज निर्माण करत असून, हा एक मोठा पर्यावरणपूरक पाऊल मानले जाते.
विमानतळाची खास वैशिष्ट्ये
या विमानतळाची रचना इतकी बुद्धिमत्तापूर्ण आहे की त्याच्या छतावर वर्षभरात साचणारे पावसाचे पाणी विशेष यंत्रणेद्वारे गोळा केले जाते. अहवालांनुसार, इथून दरवर्षी जवळपास 2 अब्ज लिटर पाणी साठवले जाते, जे पर्यावरणीय दृष्टीने मोठी कामगिरी आहे.
राजीव गांधी विमानतळावर एकूण 2 टर्मिनल्स आहेत. एक देशांतर्गत आणि दुसरे आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांशी हे सहज जोडले गेले आहे. तसेच दुबई, सिंगापूर, बँकॉक, लंडन यांसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्येही येथून थेट उड्डाणे होतात.