PNB खातेदारांसाठी मोठी बातमी!’या’ तारखेपूर्वी KYC अपडेट करा, नाहीतर खाते होईल बंद

Published on -

जर तुमचं बँक खातं पंजाब नॅशनल बँकेत असेल, तर ही बातमी तुम्ही गांभीर्यानं वाचलीच पाहिजे. कारण एका महत्त्वाच्या तारीखीनंतर जर तुम्ही एक छोटं पण गरजेचं काम केलं नाही, तर तुमचं खातं बंद होण्याची किंवा व्यवहारांवर बंधन येण्याची शक्यता आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना पूर्वसूचना दिली असून, वेळेत पावलं उचलणं ही आता तुमची जबाबदारी आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या सूचना

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या खातेदारांना 8 ऑगस्ट 2025 ही अंतिम तारीख ठरवून दिली आहे, त्याआधी तुम्हाला तुमचं ‘केवायसी’ म्हणजेच Know Your Customer अपडेट करणं आवश्यक आहे. हे पाऊल बँकेनं घेतलंय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, जे बँकिंग क्षेत्र अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.

केवायसी म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. साध्या भाषेत सांगायचं झालं, तर बँकेनं तुमच्याकडून घेतलेली ओळख आणि पत्ता यासारखी मूलभूत माहिती, जिचा वापर करून खातं उघडण्यात येतं. पण ही माहिती केवळ एकदाच पुरवणं पुरेसं नसतं, ती वेळोवेळी अद्ययावत करणं बँकेसाठी आणि तुमच्यासाठीही गरजेचं असतं. कारण अशा अद्ययावत माहितीतून फसवणुकीपासून संरक्षण करता येतं, तसेच मनी लाँडरिंग किंवा बनावट व्यवहार टाळता येतात.

8 ऑगस्टनंतर खातं होऊ शकतं बंद

जर तुमचं केवायसी अपडेट 30 जून 2025 पर्यंतही प्रलंबित असेल, तर ही सूचना तुमच्यासाठी आहे. कारण अशा प्रलंबित केवायसी असलेल्या खात्यांवर 8 ऑगस्टनंतर व्यवहारांवर आंशिक किंवा पूर्ण बंधन लागू होऊ शकतं. म्हणजेच, बँकिंग व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात, किंवा खातं गोठवलं जाऊ शकतं.

पीएनबीने स्पष्ट केलं आहे की केवायसी अपडेट प्रत्येक खातेदारासाठी अनिवार्य नाही, परंतु ज्यांचं केवायसी खूप पूर्वी केलं गेलं होतं, त्यांना हे आता नव्यानं करावं लागणार आहे. ओळखपत्र, पत्ता पुरावा, नवीन छायाचित्र, पॅन कार्ड (किंवा फॉर्म 60), उत्पन्नाचा पुरावा, मोबाइल नंबर ही सर्व कागदपत्रं तुम्ही जवळच्या शाखेत सादर करू शकता.

घरबसल्या करा केवायसी अपडेट

तुमच्यासाठी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे केवायसी अपडेट करण्यासाठी तुम्हाला शाखेत जाण्याचीही गरज नाही. पीएनबी वन मोबाइल अ‍ॅप किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करून हे काम तुम्ही ऑनलाइनसुद्धा पूर्ण करू शकता. किंवा तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा पोस्टमार्फतही आवश्यक कागदपत्रं बँकेला पाठवू शकता. पण लक्षात ठेवा, हे सगळं 8 ऑगस्ट 2025 च्या आतच करावं लागेल.

बँकेनं ग्राहकांचं वर्गीकरण ‘जोखीम श्रेणीनुसार’ केलं आहे. उदा. उच्च जोखीम गटातील ग्राहकांनी दर 2 वर्षांनी एकदा केवायसी अपडेट करणं आवश्यक आहे, मध्यम जोखीम गटातल्या खातेदारांनी दर 8 वर्षांनी, तर कमी जोखीम गटातल्या ग्राहकांनी दर 10 वर्षांनी ही प्रक्रिया पूर्ण करणं अपेक्षित आहे. या मागचं कारण साधं आहे, बँकेला खातेदारांची खरी आणि ताजी माहिती लागते, जेणेकरून कुठलाही धोका ओळखता येईल आणि रोखता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!