बिग बॉस हा एक असा शो आहे ज्याचं नाव उच्चारलं की टीव्हीच्या पडद्यावर धडकी भरवणारे टास्क, भांडणं, गॉसिप्स आणि नात्यांमध्ये येणारे ट्विस्ट आठवतात. प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाही बिग बॉस 19 च्या चर्चांना जोर आलाय. पण यंदा या शोसंदर्भात एक वेगळीच चर्चा रंगतेय कोण येणार यावर नव्हे, तर कोण-कोण या शोची ऑफर नाकारून बाहेरच राहिलंय यावर.

शोचे सूत्रसंचालक सलमान खान याच्या उपस्थितीमुळे बिग बॉसचं वजन वाढतं, त्यामुळे त्यामध्ये सहभागी होण्याची संधी अनेकांसाठी मोठी असते. पण आश्चर्य म्हणजे काही नावाजलेले सेलिब्रिटी, ज्यांची एन्ट्री झाल्यास प्रेक्षकांचं लक्ष निश्चितपणे खेचलं असतं, त्यांनी ही ऑफर नम्रपणे नाकारली आहे. या यादीत बॉलिवूडपासून यूट्यूबपर्यंत आणि टीव्हीपासून स्टँडअप कॉमेडीपर्यंत अनेक क्षेत्रातील चेहरे आहेत.
‘या’ स्टार्सने नाकारली ऑफर
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, जो ‘द ट्रेटर्स’ शोमधून पुन्हा चर्चेत आला होता, त्याच्याकडे बिग बॉसची ऑफर आली होती. मात्र त्याने ती नाकारत स्वतःचं वेगळं स्टँड घेतलं. त्याचप्रमाणे यूट्यूबर पुरव झा, जो आजच्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहे, त्याने देखील शोचा भाग होण्यास नकार दिला. हे दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असूनसुद्धा त्यांनी टीआरपीच्या खेळात उतरायचं टाळलं.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री लता सभरवाल, जिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये आईच्या भूमिकेतून मन जिंकले, तिनेसुद्धा बिग बॉसमध्ये जाणं पसंत केलं नाही. विक्रम सिंगसारखा चित्रपट अभिनेता, ममता कुलकर्णीसारखी 90 च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री, आणि लोकांना नेहमीच उत्सुक ठेवणारी मुनमुन दत्ताही या यादीत आहेत.
अनेकांना वाटत होतं की, फिटनेस क्वीन आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ यावेळी नक्की एन्ट्री घेईल, पण तिनेही ‘नकोच’ म्हटलं. सलमान खानशी जवळीक असलेल्या युलिया वंतूरचा सहभाग तर चाहत्यांना फारच भावला असता, पण तीही यावेळी घराबाहेरच राहणार आहे.
नव्या सिझनसाठी प्रेक्षक प्रचंड उत्साही
याशिवाय, सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली जन्नत जुबैर, वादग्रस्त पण बुद्धिबळाच्या समालोचनासाठी चर्चेत असलेला स्टँडअप कॉमेडियन समय रैना, टीव्ही अभिनेता राम कपूर आणि रोमँटिक भूमिका करणारा शरद मल्होत्रा या साऱ्यांनी बिग बॉसच्या घराचा दरवाजा ओलांडणं नाकारलं.
प्रेक्षक मात्र अजूनही उत्सुक आहेत. यंदाचा सीझन कसा असेल, कोणत्या अनोळखी चेहऱ्यांना मोठं व्यासपीठ मिळेल, कोण भांडतील, कोण मैत्री करतील… आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यंदाचा विजेता कोण ठरेल? हे पाहणं आता खऱ्या अर्थानं रंजक ठरणार आहे.