कधीही असं झालंय का, की ऑफिसला जायच्या घाईगडबडीत शर्टच्या खिशात ठेवलेला पेन गळाला आणि शाईचा डाग लावून गेला? अगदी नवा शर्ट असला, तरी या काळ्या-निळ्या डागाने सगळाच मूड खराब होतो. मग कितीही धुतलं, तरी हा हट्टी डाग काही जात नाही. पण चांगली बातमी अशी की, आता तुम्हाला नवा शर्ट फेकून देण्याची गरज नाही. घरच्या घरी, स्वस्तात आणि अगदी सहजपणे हे शाईचे डाग दूर करता येऊ शकतात.

कपड्यांवर लागलेले शाईचे डाग साध्या पाण्याने निघत नाहीत. उलट धुतल्यावर कधी-कधी अधिक पसरतात. म्हणूनच डाग काढताना थोडा संयम आणि योग्य पद्धत वापरणं गरजेचं असतं. आणि आश्चर्य म्हणजे, या उपायांसाठी तुम्हाला कोणताही महागडा प्रॉडक्ट वापरण्याची गरज नाही. बहुतेक गोष्टी तुमच्या घरातच असतात.
अल्कोहोल
शाईचे डाग काढण्यासाठी पहिला उपाय म्हणजे अल्कोहोल, जसं की हँड सॅनिटायझर किंवा मेडिकल स्पिरीट. एक स्वच्छ कापूस घ्या, त्यावर थोडं सॅनिटायझर टाका आणि डागाच्या भागावर हळुवारपणे चोळा. डाग पसरू नये याची काळजी घ्या. काही वेळातच तुम्हाला फरक दिसेल.
टूथपेस्ट
जर तुम्ही हँड सॅनिटायझर वापरू इच्छित नसाल, तर टूथपेस्टही चांगला पर्याय आहे. साधी पांढरी टूथपेस्ट घ्या जेल नव्हे. ती डागावर लावून 5-10 मिनिटांसाठी सोडा आणि मग हळूवारपणे घासून धुवा. याचा उपयोग विशेषतः हलक्या डागांसाठी उत्तम होतो.
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा
तिसरा उपाय म्हणजे व्हिनेगर आणि बेकिंग सोडा. दोघांची पेस्ट तयार करा आणि टूथब्रशने ती डागावर घासा. थोडा वेळ ठेवल्यानंतर कपडा पाण्याने धुऊन घ्या. ही पद्धत विशेषतः जुनाट किंवा खोलवर गेलेल्या डागांसाठी प्रभावी ठरते.
नेल पॉलिश रिमूव्हर
आणि जर हे सर्व पदार्थ घरात नसतील, तरी एक उपाय तुमच्याकडे नक्की असेल नेल पॉलिश रिमूव्हर. यात असलेलं अल्कोहोल डागांवर चांगलं काम करतं. थोडं रिमूव्हर कापसावर टाका आणि डागावर लावून घासा. काही वेळातच डाग कमी व्हायला लागतो.