आपल्या संस्कृतीत मदत करणे ही एक उदात्त गोष्ट मानली जाते. आपले आईवडील, गुरू, धर्मग्रंथ हे सर्व आपल्याला शिकवतात की गरजूंना मदतीचा हात द्यावा. पण या मदतीच्या मागे जर विचारशून्य भावना असतील, तर त्याचा परिणाम केवळ तुमच्यावरच नव्हे, तर तुमच्या कुटुंबावर आणि संपूर्ण आयुष्यावरही होऊ शकतो. आचार्य चाणक्य यांनी या विषयावर फार स्पष्ट आणि तितक्याच कठोर शब्दांत मार्गदर्शन केलं आहे. त्यांचं मत आहे की, मदत करताना केवळ दयाळूपणा नव्हे, तर शहाणपण आणि दूरदृष्टी देखील अत्यावश्यक आहे.

भावनिक होऊन मदत करू नका
खूप वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीचं दु:ख, त्याचे अश्रू आणि त्याची बेबसी आपल्याला आतून हलवून टाकते. त्या क्षणी आपण थोडाही विचार न करता पुढे सरसावतो आणि मदतीचा हात देतो. पण हेच क्षण अनेकदा आपल्या भविष्याला संकटात ढकलू शकतात. कारण प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती खरीच गरजू असेल, असं नाही. चाणक्य सांगतात की, कोणतीही मदत करण्याआधी त्या व्यक्तीचा हेतू समजून घ्या. तो फक्त भावनिक खेळ तर खेळत नाही ना, हे तपासा. कारण या जगात अशीही माणसं आहेत जी सहानुभूती मिळवण्यासाठी नकली दु:खाचं नाटक करतात.
त्याचप्रमाणे, एखादी व्यक्ती जर वारंवार तुमच्याकडे मदतीसाठी येत असेल, तर ही सवय सावधगिरीने पाहायला हवी. चाणक्य म्हणतात की वारंवार मदत मागणं, ही एक तर आळशी वृत्तीची सवय असते, नाहीतर मागे काहीतरी स्वार्थी हेतू लपलेला असतो. अशावेळी तुमच्या मदतीचा फायदा घेऊन दुसरं कोणी तुमच्यावरच संकट आणू शकतं.
मर्यादा असावी
खरंतर, आपली मदत किती आणि कुठे द्यावी, याची एक मर्यादा असावी. स्वतःच्या आर्थिक, मानसिक किंवा सामाजिक क्षमतेपेक्षा जास्त पुढे जाऊन मदत करणं ही शहाणपणाची गोष्ट नाही. कारण यामुळे तुम्ही स्वतः अडचणीत येऊ शकता, तुमचं कुटुंब असुरक्षित होऊ शकतं, आणि मदत करताना मिळालेलं पुण्यच उलट त्रासदायक ठरू शकतं.
दबावाखाली मदत करू नका
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कोणाच्या दबावाखाली मग तो मित्र असो, नातेवाईक असो किंवा सामाजिक ओळख अशावेळी मदत करण्याचा निर्णय घेऊ नका. भावना आणि बंधनं जरी महत्त्वाची असली, तरी ती अंधारात नेणारी नसावीत. चाणक्य सांगतात की, अंधश्रद्धेप्रमाणे अंधमदतही संकटच ओढवते.
म्हणूनच, मदत करा पण डोळसपणे. आपल्यातील दयाळूपणा आणि विवेक यांच्यात समतोल राखला तरच खरी आणि शाश्वत मदत करता येते. चाणक्य नीती आजच्या काळातही तितकीच लागू आहे, कारण मदतीचा हात हा जर जबाबदारीनं पुढे सरसावला गेला, तरच तो दुसऱ्याचं जीवन उजळवू शकतो, अन्यथा तो स्वतःचं जीवन अंधारात ढकलू शकतो.