अनेक वेळा आपण टरबूज फक्त त्याच्या गुळगुळीत आणि चमकदार बाह्यरूपावरून खरेदी करतो. पण खरं सांगायचं तर, हेच टरबूज अनेकदा कृत्रिम रसायनांनी पिकवलेलं असतं किंवा रंग दिलेला असतो. त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच टरबूज खरेदी करताना आणि खाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं अत्यावश्यक आहे.

जर तुम्ही टरबूज कापल्यानंतर त्याच्या आतमध्ये जाळीसारख्या किंवा पोकळ वळणाऱ्या रेषा दिसल्या, तर ते टरबूज खाणं टाळा. या रेषा म्हणजे त्यावर रसायनांचं इंजेक्शन दिलं गेलं असल्याची शक्यता असते. काही विक्रेते टरबूज अधिक गडद लाल आणि गोडसर दिसावं म्हणून त्यात कृत्रिम रंग मिसळतात. हे रंग आपल्या पचन संस्थेसाठी धोकादायक ठरू शकतात.
रंग किंवा डाग
सामान्यपणे, जे टरबूज नैसर्गिकरित्या पिकलेले असतात, त्यांच्या बाह्यभागावर थोडेफार तपकिरी किंवा पिवळसर डाग दिसतात. हे डाग त्या फळाच्या झाडावर असतानाच्या पोझिशनमुळे पडतात आणि तेच डाग टरबूज नैसर्गिक असल्याचं लक्षण असतं.
नैसर्गिक पिकवलेले टरबूज ‘असे’ ओळखा
टरबूज खरेदी केल्यानंतर त्यात कृत्रिम रंग मिसळले आहेत की नाही, हे तपासायचा एक सोपा घरगुती उपाय आहे. एक टरबूजाचा छोटासा तुकडा घ्या आणि तो पांढऱ्या रंगाच्या टिश्यू पेपरवर चोळा. जर टिश्यूवर लालसर किंवा गुलाबी रंग उमटला, तर ते टरबूज कृत्रिम रंगाने रंगवलेलं असण्याची शक्यता आहे. पण जर टिश्यू शुद्ध राहिला, तर ते फळ खात्रीने नैसर्गिक आणि सुरक्षित आहे.
सध्या बाजारात नकली आणि रसायनयुक्त टरबूज सहज विकले जातात. दिसायला सुंदर असले तरी ते तुमच्या आरोग्याला मोठा धोका पोहोचवू शकतात. त्यामुळे चव आणि थंडावा मिळवायच्या घाईत आपल्या शरीरावर रासायनिक हल्ला होणार नाही याची खबरदारी घेणं आपल्याच हातात आहे.