भारतात असंख्य मंदिरं आहेत, परंतु काही मंदिरांच्या चमत्कारी आणि रहस्यमय गोष्टी ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. अशीच एक अद्भुत कथा तेलंगणामधील लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराची आहे, जिथे भक्तांचा ठाम विश्वास आहे की देव स्वतः येथे जिवंत स्वरूपात वास करतो. इतकंच नव्हे तर येथे असलेली मूर्ती दाबली तर रक्तही येते, आणि मूर्तीजवळ गेल्यावर श्वास चालल्यासारखं जाणवतं.

हे मंदिर तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील मल्लूर या छोट्याशा गावात पुट्टकोंडा टेकडीवर, समुद्रसपाटीपासून 1500 फूट उंचीवर स्थित आहे. या उंच टेकडीवर चढून पोहोचावं लागतं, जिथे भक्तांना एक अत्यंत दिव्य आणि चैतन्यमय अनुभव मिळतो.
मूर्ती स्वतः प्रकट झाली?
भक्तांच्या मान्यतेनुसार, लक्ष्मी नरसिंह स्वामींची ही मूर्ती मानवनिर्मित नसून स्वयंभू आहे, म्हणजे ती स्वतः या डोंगरावर प्रकट झाली आहे. मूर्तीची रचना आणि तिच्यात असलेली चेतना यामुळे ती कुठल्याही सामान्य दगडात कोरलेल्या मूर्तीसारखी वाटत नाही.
हे ऐकून आश्चर्य वाटेल पण स्थानिक आणि अनेक भक्त सांगतात की 10 फूट उंच असलेल्या या मूर्तीला जर सौम्य दाब दिला, तर ती मऊसर जाणवते. मूर्तीवर एखादं फूल ठेवून ते दाबल्यास ते आत जाते, आणि जर ती जास्त दाबली गेली तर रक्तसारखा लाल रंग बाहेर येतो, असे अनुभव काही भक्तांनी घेतले आहेत.
हे आणखी एक रहस्य आहे की मूर्तीच्या नाभीच्या भागातून एक विशिष्ट द्रव सतत झिरपत असतो. या द्रवाचा प्रवाह रोखण्यासाठी नित्यनेमाने चंदन लावलं जातं. स्थानिक लोक आणि पुजारी याचा अतिशय धार्मिकतेने आणि श्रद्धेने उपचार करतात.
मूर्तीत देव खरंच वास करतात?
हे मंदिर विशेषतः त्या भाविकांसाठी एक अद्वितीय अनुभव असतो जे भक्तिभावाने मूर्तीजवळ जातात. त्यांना वाटतं की मूर्ती श्वास घेत आहे. हा अनुभव इतका जिवंत वाटतो की भक्तांना वाटतं, भगवान नरसिंह स्वामी इथे प्रत्यक्ष वास करत आहेत.
हे मंदिर सुमारे 4000 वर्षं जुने मानले जाते. इतक्या पुरातन काळापासून या स्थळाची महती टिकून आहे. येथील परंपरा, पूजा आणि मूर्तीचा जिवंतपणा यामुळे ते केवळ मंदिर न राहता एक दैवी अनुभूतीचं केंद्र बनले आहे.