भारतात यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून मिळणाऱ्या शासकीय पदांची एक खास मोहिनी आहे. यामध्ये आयएएस आणि आयएफएस या दोन प्रमुख सेवांकडे सर्वाधिक आकर्षण असते. एक जिल्हाधिकारी होतो, तर दुसरा भारताचा परदेशात राजदूत! पण नेमकं कोण किती पगार घेतं? याचे उत्तर फक्त आकड्यांमध्ये नाही, तर त्या पदाच्या स्वरूपातही लपलेलं आहे.

जिल्हाधिकारी पद
यूपीएससी परीक्षेत अव्वल गुण मिळवणारे उमेदवार सामान्यतः आयएएस बनतात. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात होते जिल्हाधिकारी पदापासून. एका संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन त्यांच्या खांद्यावर असते. त्यांना सुरुवातीला सुमारे ₹56,000 पगार मिळतो आणि हा पगार सेवेनुसार आणि पदोन्नतीनुसार ₹2,50,000 पर्यंत जातो. यासोबतच त्यांना घरभत्ता, वाहन, सरकारी निवासस्थान आणि इतर भत्तेही मिळतात. म्हणजेच, एकूण पॅकेज खूप मोठं असतं.
भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी
दुसरीकडे, आयएफएस म्हणजेच भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी, जे परदेशातील भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचाही सुरुवातीचा पगार ₹56,100 पासून सुरू होतो. पण विशेष म्हणजे, जेव्हा हे अधिकारी परदेशात राजदूत म्हणून तैनात होतात, तेव्हा त्यांना भारतीय पगारासोबतच फॉरेन अलाउन्स म्हणजे परदेशी भत्ता मिळतो.
या भत्त्यांची रक्कम त्यांच्या तैनातीच्या देशावर अवलंबून असते. काही देशांमध्ये हे भत्ते ₹2.5 लाखांपर्यंत असू शकतात. म्हणजेच, आयएफएस अधिकाऱ्यांचा एकूण पगार बऱ्याच वेळा आयएएस अधिकाऱ्यांपेक्षा जास्त असतो.
पण, हे वेतन फक्त आकड्यांत मोजता येत नाही. आयएएस अधिकाऱ्यांना भारतात सर्वसामान्यांच्या थेट संपर्कात राहून काम करायची संधी मिळते, तर आयएफएस अधिकाऱ्यांचे जीवन अधिक खासगी, सुरक्षित पण दूरदेशी असते. म्हणजेच, प्रत्येक पदाची आपली एक खासियत आणि आकर्षण आहे.