अंडरआर्म्स काळे पडणे ही गोष्ट अनेकांना सौंदर्यदृष्ट्या त्रासदायक वाटते. समर ड्रेस, स्लीवलेस कपडे किंवा स्विमवेअर घालायचे म्हटलं, डार्क अंडरआर्म्स प्रचंड त्रासदायक ठरतो. पण ही फक्त एक कॉस्मेटिक समस्या आहे का? खरेतर, काळे अंडरआर्म्स म्हणजे त्वचेचा रंग गडद होणं हे काही वेळा शरीरात सुरू असलेल्या गंभीर आरोग्य समस्यांचे सूचक असतेआणि याकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
काहींना वाटतं की अंडरआर्म्स काळे होण्याचं कारण केवळ स्वच्छतेकडे दुर्लक्ष, ड्राय शेव्हिंग, परफ्युम्समधील केमिकल्स किंवा टाइट कपडे घालणं आहे. परंतु हे त्रास मेलेनिन या त्वचेच्या रंगासाठी जबाबदार घटकाच्या जास्त निर्मितीमुळे होत असतो. विशेषतः काही विशिष्ट आजारांमुळेही त्वचेत हा गडदपणा दिसून येतो आणि याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

मधुमेह
सर्वात सामान्य कारण म्हणजे मधुमेह. अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स नावाची त्वचाविकाराची अवस्था मधुमेहाच्या आधीची चेतावणी असू शकते. या स्थितीत अंडरआर्म्स, मान, कोपरे किंवा कंबर अशा भागांमध्ये गडद, जाडसर आणि मखमलीसरखी त्वचा दिसते. ती केवळ दिसायला वेगळी नसते, तर ती शरीरात सुरू असलेल्या इन्सुलिन प्रतिकाराची सुरुवातही सूचित करते.
लठ्ठपणा
तसेच, लठ्ठपणाही हेच परिणाम घडवतो. शरीरात फॅट जास्त झालं की हार्मोनल असंतुलन तयार होतं आणि त्यामुळे त्वचेत अति मेलेनिन तयार होतो. यामुळे अॅकॅन्थोसिस निग्रिकन्सची लक्षणं दिसू लागतात.
थायरॉईड
थायरॉईडची असमतोल कार्यप्रणाली देखील त्वचेत गडदपणा निर्माण करू शकते. विशेषतः हायपोथायरॉईडीझममुळे त्वचेत कोरडेपणा, गडदपणा आणि जाडसरपणा वाढतो. त्यामुळे अचानक अंडरआर्म्स काळे दिसू लागल्यास थायरॉईड तपासणी गरजेची ठरते.
PCOS
महिलांमध्ये पीसीओएस (PCOS) हे आणखी एक कारण असू शकते. पीसीओएसमुळे हार्मोनल असंतुलन होते आणि शरीरात अँड्रोजेन्सची पातळी वाढते. यामुळे चेहऱ्यावर, शरीरावर केस वाढतात, वजन वाढते आणि त्वचेत बदल दिसू लागतात, ज्यामध्ये डार्क अंडरआर्म्सचा समावेश आहे.
फंगल इन्फेक्शन
याशिवाय, काही वेळा बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शनमुळेही अंडरआर्म्स काळे होऊ शकतात. सतत घाम येणे, हवेशीर कपड्यांचा अभाव आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे अशा संसर्गाचा धोका वाढतो. विशेषतः गरम हवामानात हे त्रास जास्त होतात.
अंडरआर्म्स काळे झाले असतील, तर सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातींवर अवलंबून राहण्याऐवजी त्यामागची कारण शोधणं फार गरजेचं आहे. घरगुती उपायांमध्ये लिंबाचा रस, कोरफड जेल, नारळ तेल आणि बेकिंग सोडा यांसारख्या गोष्टी मदतीला येतात, परंतु ही फक्त सुरुवात आहे. त्वचेचा हा बदल केवळ बाह्य उपायांनी न सुधारल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं.