घरातील सौंदर्य वाढवण्यासाठी आणि वातावरणात शांती निर्माण करण्यासाठी आपण झाडं लावतो. मात्र प्रत्येक झाड केवळ डोळ्यांना सुखावणारं असतं असं नाही; काही झाडं आपल्या जीवनात सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घडवू शकतात. त्याबाबत भारतीय वास्तुशास्त्रात स्पष्ट मार्गदर्शन दिलं आहे. याच अनुषंगाने एक रोप असं आहे, जे आपल्या सौंदर्यपरंपरेत खास स्थान राखून आहे, ते म्हणजे मेंदी.

हिंदू संस्कृतीत मेंदीचं स्थान केवळ हाताला रंग देणाऱ्या वनस्पतीपुरतं मर्यादित नाही. करवा चौथ, हरतालिका तीज, वट सावित्री यांसारख्या सणांमध्ये महिलांच्या मेहंदीने रंगलेल्या हातांना शुभतेचं प्रतीक मानलं जातं. विवाहसमारंभ असो की पारंपरिक पूजाअर्चा, सौंदर्य आणि मंगलतेच्या प्रतीकासारखी मेंदी आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे.
मेंदीचे रोप
पण दुसरीकडे, वास्तुशास्त्र मात्र मेंदीच्या रोपाबाबत थोडं सावध राहायला सांगतं. वास्तुशास्त्रानुसार, घरात मेंदीचं रोप लावणं योग्य नाही असं मानलं जातं. मेंदीच्या झाडाला येणारा सौम्य गंध जरी प्रसन्न वाटत असला, तरी वास्तुच्या दृष्टीने या झाडाशी नकारात्मक ऊर्जा जोडलेली आहे. असं म्हटलं जातं की, मेंदी जिथे लावली जाते तिथे घरात मानसिक तणाव, अस्थिरता, भांडणं आणि अडथळ्यांचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता वाढते.
वास्तुच्या मतानुसार, मेंदीसारख्या वनस्पतींचा प्रभाव इतका सूक्ष्म असतो की तो घराच्या एकंदर ऊर्जासंचालनावर परिणाम करतो. यामुळेच अनेक वास्तु तज्ज्ञांनी मेंदीचं झाड घराच्या अंगणात, बाल्कनीत किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावणं टाळावं असं स्पष्टपणे सांगितलं आहे.
‘ही’ झाडेही घराजवळ लावू नये
मेंदीप्रमाणेच काही इतर झाडंही अशुभ मानली जातात. उदाहरणार्थ बाभळी, चिंच किंवा कापसाचं झाड. ही झाडं नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात, असं वास्तु मानतं. त्यामुळे जर तुमचं घर शांत, सकारात्मक आणि समृद्ध व्हावं अशी इच्छा असेल, तर अशी झाडं लावणं टाळणं योग्य ठरतं.
त्याऐवजी वास्तुशास्त्रात काही झाडं अतिशय शुभ मानली जातात. तुळस ही भारतीय परंपरेत देवतेच्या प्रतीकासारखी मानली जाते, तर मनी प्लांट आर्थिक समृद्धीचं प्रतिक ठरतं. अशोक वृक्ष हे देखील मानसिक शांती आणि घरातील सौख्य वाढवतं, असं मानलं जातं. ही झाडं पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावल्यास घरात सकारात्मक उर्जेचा वावर अधिक मजबूत होतो.
मेंदीचा रंग, गंध आणि धार्मिक महत्त्व निश्चितच अनन्यसाधारण आहे. पण जर तुम्ही वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शनानुसार घरात सुख, शांती आणि समाधान टिकवून ठेवू इच्छित असाल, तर मेंदीसारख्या वनस्पती लावण्यापेक्षा तुळस, मनी प्लांटसारख्या शुभ वनस्पतींना प्राधान्य द्या.