घरातील सजावट म्हणजे केवळ भिंती रंगवण्यापुरती मर्यादित नसते. ती आपल्या मन:स्थितीवर, नातेसंबंधांवर आणि अगदी घराच्या आर्थिक स्थैर्यावरही प्रभाव टाकू शकते. घर सजवताना आपण अनेक वेळा सुंदर चित्रं, फ्रेम्स आणि फोटोंची निवड करतो पण ही निवड जर थोडीशी विचार न करता केली, तर ती आपल्या आयुष्यात नकारात्मकतेचं सावट घेऊन येऊ शकते. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे विशेष महत्त्वाचं ठरतं.

वास्तुशास्त्रानुसार, घरातील चित्रं ही फक्त भिंती सजवण्यासाठी नसतात, तर त्या चित्रांतून घरात ऊर्जा प्रसारित होते. योग्य चित्र योग्य दिशेला लावल्यास ती ऊर्जा सकारात्मक असते, पण जर चुकीचं चित्र चुकीच्या ठिकाणी असेल, तर त्याचा परिणाम घरातील लोकांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. काही चित्रं अशी असतात, जी घरात चुकूनही लावू नयेत, कारण ती संपत्तीचा अडसर, मानसिक अशांती, किंवा नात्यांतील दुरावा आणू शकतात.
उदाहरणार्थ, बुडणाऱ्या जहाजाचं चित्र हे घरात संकट आणणारं मानलं जातं. या चित्रामागील भावना असते – बुडणं, अपयश, आणि अधांतरीपणा. म्हणूनच असे चित्र भिंतीवर लावल्यास सुरू असलेली कामं अडकू शकतात किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
युद्धाचं चित्र
तसंच युद्धाचं चित्र, जिथे तलवारी झळकत असतात आणि वातावरण आक्रमक असतं, ते देखील घरात अशांततेचं कारण ठरू शकतं. नटराजाच्या तांडव मुद्रेमधील मूर्ती किंवा चित्र हे शिवाचे उग्र रूप दर्शवतात. हे चित्र एखाद्या नृत्यशाळेत शोभून दिसेल, पण घरात यामुळे क्रोध, वादविवाद आणि तणाव वाढण्याची शक्यता असते.
रडणाऱ्या मुलांची चित्रे
काही लोकांना रडणाऱ्या मुलांची कलाकृती आवडते, त्यामागे कदाचित भावनिक आकर्षण असतं. पण वास्तुशास्त्र सांगतं की अशा चित्रांमुळे घरात दुःख, नैराश्य, आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. घरात सतत आनंदाचे वातावरण राहण्यासाठी अशा नकारात्मक भावनांपासून दूर राहणं आवश्यक आहे.
गुलाबाचं फूल
गुलाबाचं फूल ऐकायला सुरेख वाटतं, पण वास्तुशास्त्रात काटेरी वनस्पतींचं चित्र किंवा प्रत्यक्ष रोप नकारात्मक ऊर्जा वाढवतं, असं मानलं जातं. गुलाबाच्या काट्यांनी सजलेली फुले एखाद्या बगीच्यासाठी योग्य असतील, पण घराच्या मंदिरात, शयनगृहात किंवा मुख्य दरवाज्याजवळ हे चित्र टाळावं.
घर म्हणजे एक ऊर्जा केंद्र आहे. जिथे आपण आपल्या प्रियजनांसोबत जीवन घडवत असतो. त्यामुळे घराच्या भिंतींवर काय असावं हे फार काळजीपूर्वक निवडणं आवश्यक आहे. केवळ सौंदर्याच्या दृष्टीने नव्हे, तर भावनिक आणि आध्यात्मिक संतुलन राखण्यासाठीही हे विचार फार महत्त्वाचे ठरतात.