दिवसेंदिवस जीवनाची गती इतकी वाढली आहे की आपण सर्वजण काही ना काही झटपट शोधतो आहोत. मग ते काम असो, प्रवास असो किंवा जेवण. या धावपळीत एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या ताटात नकळत घर करून बसली आहे, ती म्हणजे नूडल्स. चविष्ट, बनवायला झटपट आणि दिसायलाही आकर्षक. विशेषतः मुलांना नूडल्स खूप आवडतात, त्यामुळे टिफिनपासून संध्याकाळच्या स्नॅक्सपर्यंत त्यांचा सगळीकडे वापर वाढतो आहे. मात्र, या ट्रेंडमुळे पारंपरिक आणि पोषणमूल्यांनी भरलेलं आपलं डाळ-भात, पोळी-भाजीचं जेवण कुठे हरवतंय का, असा विचार आता अनेक पालक करू लागले आहेत.

नूडल्सचे घातक परिणाम
नूडल्सचा वाढता वापर आपल्या आरोग्याशी जोडलेला मोठा प्रश्न बनतो आहे. अलीकडेच सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे खळबळ उडाली होती, ज्यात रामेन नूडल्सच्या पॅकेटवर असलेल्या इशाऱ्याची चर्चा झाली. त्या चेतावणीमधून असे समजले की काही नूडल्समध्ये असे रसायनं असतात जे दीर्घकाळ वापरल्यास कर्करोगाचा धोका वाढवू शकतात किंवा प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे आणि ते आपल्या मुलांच्या खाण्याच्या सवयींकडे अधिक जबाबदारीने पाहू लागले आहेत.
आरोग्य तज्ञांचाही इशारा
आरोग्य तज्ज्ञ या गोष्टीवर बराच काळ बोलत आहेत. त्यांच्या मते, नूडल्ससारखी तयार खाद्यपदार्थं ही केवळ एक फास्ट फूड नसून त्यांचा परिणाम दीर्घकालीन असतो. त्यात जास्त प्रमाणात सोडियम, कृत्रिम चवद्रव्यं आणि संरक्षक द्रव्यं असतात, जे पचनतंत्र, वजनवाढ आणि हृदयविकारासारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.
काही वेळा या गोष्टी लगेच जाणवत नाहीत, पण त्यांच्या सवयींचा परिणाम पुढे जाऊन गंभीर होतो. म्हणूनच पारंपरिक जेवण जसं की डाळ-भात, पोळी, भाजी आणि घरच्या घरी बनवलेलं अन्न हेच दीर्घकाळ आरोग्य टिकवण्यासाठी योग्य मानलं जातं.
आपल्या जीवनशैलीत वेळ वाचवण्यासाठी आपण नूडल्ससारख्या सोयीच्या गोष्टी निवडतो, हे खरं आहे. पण त्या सोयीची किंमत आपण आपल्या शरीराच्या आरोग्याने चुकवतो, हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. नूडल्स हे अधूनमधून खाणं ठीक आहे, पण ते रोजच्या जेवणाचा पर्याय बनवणं आपल्या शरीरासाठी मोठं नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे वेळ आणि सोय यांच्याबरोबरच आरोग्याची काळजी घेणं हे आपल्याच हाती आहे.