शूज काढताच येणारा वास अनेकांना त्रासदायक वाटतो, पण हा त्रास केवळ तुमचाच नाही, ही एक सामान्य पण लाजिरवाणी समस्या आहे. गर्दीमध्ये असताना शूज काढायचे म्हणजे आत्मविश्वास डळमळतो आणि कधी कधी समोरच्याचा चेहरा बघून आपल्यालाच लाज वाटते. पण हा वास नेमका का येतो? आणि त्यावर खरंच काही घरगुती उपाय काम करतात का?

पायांना आलेला दुर्गंधी बहुधा घाम आणि बॅक्टेरियांमुळे होतो. दिवसभर शूजमध्ये बंद असलेल्या पायांमध्ये दमटपणा निर्माण होतो, ज्यामुळे बॅक्टेरियांची वाढ झपाट्याने होते. या बॅक्टेरियांच्या क्रियेने घामाचे रूपांतर दुर्गंधीत होतं. मात्र यावर घरात असलेल्या काही सोप्या गोष्टींनी तुम्ही उपाय करू शकता.
बेकिंग सोडा
सुरुवात करूया बेकिंग सोडाने. स्वयंपाकघरात सहज सापडणारा हा पदार्थ केवळ केक फुगवण्यासाठी नव्हे, तर पायातील दुर्गंधीही शोषून घेण्यासाठी उत्तम आहे. रात्री झोपण्याआधी शूजमध्ये थोडा बेकिंग सोडा टाकायचा आणि सकाळी ते झटकून द्यायचं. याशिवाय, बेकिंग सोडा घालून पाण्यात पाय भिजवल्यास घाम कमी होतो आणि पायांना स्वच्छता मिळते.
व्हिनेगर
व्हिनेगर, विशेषतः पांढरे व्हिनेगर किंवा अॅपल व्हिनेगर, हा आणखी एक घरगुती उपाय आहे जो बॅक्टेरिया मारण्याचं काम करतो. कोमट पाण्यात थोडा व्हिनेगर टाकून पाय त्यात बुडवले की, त्याचा प्रभाव काही दिवसांत दिसून येतो. पण लक्षात ठेवा, हा उपाय जास्त वेळा केल्याने त्वचेवर परिणाम होऊ शकतो, म्हणून आठवड्यातून दोनदा पुरेसं आहे.
ब्लॅक टी
पुढचा उपाय म्हणजे काळा चहा. त्यामध्ये असणारं टॅनिक अॅसिड घामाचे प्रमाण कमी करतं आणि बॅक्टेरियांची वाढही रोखतं. उकळलेल्या चहाच्या पाण्यात पाय भिजवल्यानं, फक्त दुर्गंधी नाही तर थकवा देखील कमी होतो.
तुरटी
आणखी एक पारंपरिक पण अत्यंत परिणामकारक उपाय म्हणजे तुरटी. यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. कोमट पाण्यात तुरटी पावडर टाकून पाय भिजवल्याने दुर्गंधी तर कमी होतोच, पण पायांना एक प्रकारचा ताजेपणाही येतो.
या सगळ्या उपायांमुळे पायांचा वास कमी होतोच, पण आत्मविश्वासातही वाढ होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा यानंतर गर्दीत शूज काढाल, तेव्हा तुम्हाला लाज वाटणार नाही.