भूकंप किंवा त्सुनामीसारखी मोठी आपत्ती येण्याआधी प्राणी अस्वस्थ, भयभीत किंवा विचित्र वागू लागतात, हे आपण अनेकदा पाहिलं आहे. 2004 साली आलेल्या त्सुनामीनंतर प्राण्यांच्या या विचित्र वर्तनावर वैज्ञानिकांचं लक्ष गेलं. लोकांना वाटलं हा केवळ योगायोग असेल, पण वैज्ञानिकांनी त्यामागे एक स्पष्ट कारण शोधलं. प्राणी माणसांपेक्षा अधिक तीव्र इंद्रियशक्तीच्या माध्यमातून निसर्गात होणाऱ्या सूक्ष्म बदलांना आधीच ओळखतात.

वैज्ञानिक कारण
त्सुनामी किंवा भूकंप यायच्या आधी कुत्री अचानक रडायला लागतात, पक्षी झुंडीने आकाशात उडून जातात, मांजरी लपून बसतात तर हत्ती थेट डोंगराकडे धाव घेतात. विशेषतः ग्रामीण भागात या वर्तनाला ‘अपशकुन’ मानलं जातं, पण विज्ञान यात निसर्गाशी थेट जोडलेली एक नैसर्गिक प्रक्रिया पाहतं.
शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, भूकंप घडण्याआधी पृथ्वीच्या आत खोलवर प्लेट्समध्ये घर्षण होऊ लागतो. त्यातून अतिशय सूक्ष्म ध्वनीलहरी, कंपनं किंवा गंध निर्माण होतात. ही लहरी माणसाला कळत नाहीत, पण प्राण्यांच्या तीव्र इंद्रियांमुळे त्यांना लगेच भास होतो की काहीतरी विचित्र घडणार आहे.
जपानमधील अर्ली वॉर्निंग सिस्टम
हत्तींच्या पायांमध्ये इतकी संवेदनशीलता असते की जमिनीतील लहान लहान हालचालीसुद्धा ते सहज ओळखू शकतात. 2004 च्या त्सुनामीच्या वेळी अंदमानमधले हत्ती धोक्याच्या आधीच सुरक्षित उंच भागाकडे गेले होते. ही घटना नोंदवल्यावर वैज्ञानिकांनी यावर अधिक अभ्यास सुरू केला.
जपानमध्ये तर आता काही भागांमध्ये प्राण्यांचं वर्तन निरीक्षण करून अर्ली वॉर्निंग सिस्टम तयार करण्यात आली आहे. कुत्र्यांचे अचानक रडणं, मांजरींचं विशिष्ट हालचाली करणं यावर आधारित अल्गोरिदम विकसित केलं जात आहे. ही प्रणाली भूकंप किंवा त्सुनामीपूर्वी माणसांना सावध करू शकते.